आॅटो जप्त : परतवाड्यात ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यातअमरावती : जिल्ह्यात अवैध लाकूडतोड, सागवान तस्करी जोरात सुरु असल्याचे बुधवारी परतवाडा वन विभागाने केलेल्या कारवाईने स्पष्ट झाले आहे. सागवान लाकूड, आॅटो रिक्षासह ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी अवैध लाकूडतोड रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. तर दुसरीकडे आरागिरणी संचालकांनी अवैध लाकूडतोडीसाठी नानाविध क्लुप्त्या लढविल्या आहेत. सागवान तस्करी रोखणे ही बाब वन विभागासाठी आव्हानात्मक आहे. परंतु उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी आरागिरण्यांवर धाडसत्र राबवून नियमबाह्य कृतीला लगाम लावला आहे. अवैध लाकूडतोड व सागवान तस्करी रोखण्यासाठी वनाधिकारी दिवसरात्र एक करीत आहे. त्याअनुषंगाने परतवाड्याचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. बीे. बारखडे यांच्या नेतृत्वात परतवाडा- बेलखेडा मार्गावर वाहन तपासणी केली असता सागवान तस्करीची घटना बुधवारी रात्री ९. ३० वाजता उघडकीस आली. वनकर्मचाऱ्यांनी वाहन रोखताच अंधाराचा फायदा घेत आॅटोचालक त्याचे साथीदार पळून गेलेत. दरम्यान मिनीडोर आॅटोची तपासणी केली असता यामध्ये सागवान लाकडाचे १४ नग घन मिटर ०.५१९ सुमारे २५ हजार रुपये किंमत असल्याचे स्पष्ट झाले. मिनीडोर क्रमांक एम.एच. २७ पी. ८६७० किंमत अंदाजे ३० हजार असे एकुण ५५ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परतवाड्याचे आरएफओ बारखडे यांच्या मार्गदर्शनात परतवाडा वनपाल बी. आर. झामरे, वनरक्षक जे.टी. काळे, एन. व्ही. ठाकरे, के. डी. काळे व वाहन चालक आर.एस. काळे आदींनी ही कारवाई केली आहे. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१)(फ) ४२,६९ महाराष्ट्र वननियमावली २०१४ चे नियम ३१,४७ चे भंग झाल्यामुळे वनगुन्हा रिपोर्ट क्रमांक १४/३ दि. ८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास आरएफओ बारखडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. अज्ञात आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)
अवैध सागवान तस्करी सुरुच
By admin | Published: February 10, 2017 12:08 AM