श्यामकांत सहस्त्रभोजनेलोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : कोरोना महामारी ओसरल्यानंतर रेल्वेगाड्या पूर्वपदावर आल्या. रेल्वे स्थानकसुद्धा प्रवाशांच्या गर्दीने फुलले. त्याचाच फायदा घेत बडनेरा रेल्वे स्थानकावर अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी धुडगूस चालवला आहे. अक्षरश: रेल्वेगाड्यांच्या गेटसमोरच विक्रेत्यांची गर्दी असते. प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते. आरपीएफ, जीआरपीसह संबंधित रेल्वे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये आहे.जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून बडनेराची सर्वदूर ओळख आहे. येथून देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करता येतो. कोरोना महामारी मागे पडल्याने आता रेल्वेगाड्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. सध्या शाळांना सुट्या असल्याने प्रवासी पर्यटनाला जात आहेत. पर्यायाने रेल्वेगाड्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी सध्या पाहावयास मिळत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्मवर आल्या की, अवैध खाद्यपदार्थ विक्रेते साहित्य विकण्यासाठी डब्यांमध्ये शिरतात. काही अक्षरशः खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रेल्वे गाड्यांच्या गेटसमोरच लावतात. प्रवाशांना गाडीतून उतरावे व चढावे कसे, याचा प्रचंड मनस्ताप झेलावा लागतो. खासकरून स्लीपर व जनरलच्या डब्यासमोर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची मोठी झुंबड असते. रेल्वे मंत्रालय प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करीत असतात. प्रत्यक्षात बडनेरा रेल्वे स्थानकावर मात्र विपरित चित्र असल्याचे वास्तव आहे.खाद्यपदार्थाची चढ्या दराने विक्री शाळांच्या सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांवरची गर्दी प्रचंड वाढली आहे. तप्त उन्हात पाणी, विविध प्रकारचे शीतपेय, खाद्यपदार्थाची चढ्या दरात विक्री होत आहे. मात्र, अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गाच्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्याची मागणीही वेळोवेळी व्यक्त होते.
मोबाईल चोरट्यांची अशीही शक्कलबडनेरा रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर प्रवासी रेल्वेगाड्या हळुवार धावतात. गाडीच्या गेटवर किंवा खिडकीजवळच्या आसनावर मोबाईल पाहणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल पाडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून यशस्वी होतो. अनेकांचे महागडे मोबाइल पळवून नेण्यात आले आहेत. काही प्रवासी तक्रार करतात, तर काही जण बाहेर गावचे असल्याने तक्रार केल्यास गाडी सुटून जाईल म्हणून तक्रार करीत नाहीत.