अमरावती : सायबर पोलिसांनी राजकमल चौकातील कौशल्या मोबाईल रिपेअरिंग दुकानात धाड टाकून मोबाईलचा आयएमईआय बदलविणाऱ्याला सोमवारी अटक केली. संघराज संपत डोंगरे (२८, रा.लढ्ढा प्लॉट, नवीवस्ती, बडनेरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दुकानातून सॉफ्टवेअर असलेले संगणक, सीपीयू व सॉफ्टवेअर वापरण्यासाठी लागणारे डोंगल जप्त केले आहे.कौशल्या रिपेअरिंग या दुकानात मोबाईल हॅन्डसेटचे आयएमईआय क्रमांक (आंतरराष्ट्रीय मोबाईल ओळख क्रमांक) बदलून दिल्या जात असल्याची गोपनीय माहिती सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांना ७ जून रोजी मिळाली. ही बाब कायद्याने गुन्हा ठरत असल्यामुळे पांडे यांनी शहानिशा करण्यासाठी सापळा रचला. त्याच दिवशी पोलिसांनी एका पंटरला कौशल्या मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलविण्यासाठी पाठविले. दुकानदाराने क्रमांक बदलून दिला. ११ जून रोजी पोलीस पंटरला मोबाईल घेऊन कौशल्या रिपेअरिंगच्या दुकानात पाठविले.पोलिसांनी दोन पंचासमक्ष दुकानदाराने आयएमईआय क्रमांक बदलवून दिल्याबाबत शहानिशा केली. त्यावरून दुकानदार आयएमईआय बदलून देत असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे पोलिसांनी कौशल्या मोबाईल रिपेअरिंग सेन्टरवर धाड टाकून झडती घेतली. पोलिसांनी जप्ती पंचनाम्याप्रमाणे कारवाई करून आरोपी संघराज डोंगरेला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा नोंदविला. संघराजने अनेकांच्या मोबाईलचे आएमईआय बदलविल्याची चौकशीत स्पष्ट झाले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात सायबर ठाण्याचे एपीआय कांचन पांडे, पोलीस हवालदार जगदीश पाली, नाहेर अली, सचिन भोयर, मयूर बोरकर, पंकज गाडे व चालक जाकीर यांनी ही कारवाई केली.मोबाईल ट्रेस होत नाहीचोरीचे किंवा हरविलेले मोबाईल ट्रेस करण्यासाठी मोबाईलचा आयएमईआय महत्त्वाचा ठरतो. त्याशिवाय ते मोबाईल ट्रेस होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक चोरी गेलेले किंवा हरविलेले मोबाईल ट्रेस झाले नसण्याची शक्यता आहे. आरोपीने निश्चीत किती मोबाईलचे आयएमईआय बदलविले हे निश्चित सांगता येणार नाही. हा क्रमांक बदलविला तर, हरविलेले किंवा चोरी गेलेले मोबाईल ट्रेस होत नाही.- कांचन पांडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक
मोबाईलचा आयएमईआय बदलविणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 8:38 PM