बच्चू कडूंचे नेतृत्व : विभागीय आयुक्तांना निवेदनअमरावती : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रश्नी शुक्रवारी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिक्षकांनी विभागीय आयुक्तालयावर धडक दिली व मागण्यांचे निवेदन सादर केले. मागील आठ वर्षांपासून रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करून दोषींवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली. यावेळी विविध जिल्हा परिषदेतील शेकडो शिक्षक उपस्थित होते. विभागीय आयुक्तांच्यावतीने उपायुक्त प्रवीण पुरी यांनी निवेदन स्वीकारले. आंतरजिल्हा बदली प्रश्नी अनियमितता झाल्याचा आरोप यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक दीपक धोटे यांनी केला. बदलीग्रस्त शिक्षकांना वेठीस धरण्याचा अधिक प्रयत्न प्रशासनाने करू नये, त्वरीत बदली प्रक्रियेचा आदेश काढून या प्रकरणी दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा परिणाम गंभीर होतील असा सज्जड दम आ. बच्चू कडू यांनी दिला. यावेळी दीपक धोटे, प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक महेश ठाकरे, प्रहार जिल्हा प्रमुख छोटू वसू, पश्चिम विदर्भ प्रमुख अविनाश श्रीवास्तव, जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर , चंदु खेडकर , बबलू माहूरकर, राजेश देवरे, नीलेश हाडोळे, अनुप डिके, नंदकीशोर धर्मे, बुटले, किरण वानखडे आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली तत्काळ करा
By admin | Published: August 20, 2016 12:06 AM