अमरावती : कोरोना विषाणूमुळे अनेक बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. त्यांची काळजी व संरक्षण करीत त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांच्या यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्ह्यात कृती दल गठित करण्यात आला आहे. अशा बालकांची माहिती आरोग्य यंत्रणेने व कृती दलाने तातडीने जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार ‘कोविड १९’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपानासाठी उपाययोजना व्हाव्यात म्हणून कृती दल गठित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकाचा फलक सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा. महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत बालगृहे, निरीक्षण गृहातील मुलांसाठी तात्काळ स्वतंत्र वैद्यकीय पथक गठित करावे. या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पोलीस दलाने सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून द्यावे. अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार, तस्करीसारख्या गुन्हेगारीत सापडणार नाहीत याचीही दक्षता पोलीस दलाने घ्यावयाची आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
टास्क फोर्सची दर १५ दिवसांनी बैठक
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांस बाल संगोपन योजनेंतर्गत लाभ देत बालकाचा ताबा नातेवाइकांकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी जिल्हा बाल कल्याण समितीने करावी. कृती दलाची बैठक दर पंधरा दिवसांनी आयोजित करावी, अशाही सूचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी बालगृहांचा आढावा घेतला. अशा अनाथ झालेल्या बालकांचे जीवनमान सहज होण्यासाठी स्थानिक प्रशासन आवश्यक ती कार्यवाही त्वरित करेल, असे नवाल यांनी सांगितले.
बॉक्स
चाईल्ड हेल्पलाईनवर संपर्क करावा
कोरोनामुळे दोन्ही पालकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्यास अशा पालकांच्या माहितीकरिता एक अतिरिक्त स्तंभाचा रिपोर्टमध्ये समावेश करण्यात यावा व या स्तंभामध्ये अशा पालकांच्या बालकांचा ताबा ज्या व्यक्तीकडे दिला आहे, त्याची माहिती भरण्यात यावी किंवा अशा बालकांचा ताबा घेण्यास कुणीही इच्छुक नसल्यास संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाने ‘चाईल्ड हेल्पलाईन १०९८’ व कृती दलाच्या समन्वयकास संपर्क साधावा, असे नवाल यांनी सांगितले.