अमरावती : जिल्ह्यात सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन दिवसांत अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून १० ते २० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हा हुडहुड वादळाचा प्रभाव असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. येत्या १२ आॅक्टोबर रोजी हुडहुड वादळ ओडीसा व आंध्र प्रदेशात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये काही सौम्य प्रमाणात जाणवणार आहे. विदर्भातील काही ठिकाणी १० ते २० किलोमीटर प्रतिताशी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दांडी मारली. मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून दुपारच्या वेळेत पावसाने हजेरी लावली आहे. मात्र तरीही उकाडा कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहे. उन्ह, ढगाळ वातावरण, पाऊस व थंडी असे वातावरण तयार झाल्याने नागरिकही संभ्रमात पडले आहेत. परतीच्या मान्सूनचा मुक्काम १५ आॅक्टोबरपर्यंत असल्यामुळे जिल्ह्यात रविवारपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवसांत विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच हुडहुड वादळामुळे विदर्भात वाऱ्याचा वेग १० ते २० किलोमीटर प्रतिताशी राहण्याची शक्यता आहे, असे संकेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामान विभागाने दिले आहे.
हुडहुड वादळाचा प्रभाव विदर्भातही जाणवणार
By admin | Published: October 11, 2014 1:07 AM