वाहकाचा मृत्यू :
वरूड : नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरळी येथील पेट्रोलपंपासमोरील रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून वाहक शौचास बसला होता. दरम्यान मागून भरधाव येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने जबर धडक दिली. यात मागून येणाऱ्या ट्रकचा दर्शानी भाग चेंदामेंदा झाला, तर शौचास बसलेल्या वाहकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारच्या पहाटे २ वाजता दरम्यान घडली.
पोलीससूत्रांनुसार, यातील मृताचे नाव मुकेश दिनेश करुले ३६ रा. टाकरखेडा (मोरे) असे आहे. गुरुवारच्या पहाटे २ वाजताचे दरम्यान नागपूर मार्गावरील कुरळी लगतच्या पेट्रोलपंपासमोर अंजनगाव (सुर्जी) येथून तुरीचे पोते घेऊन जाणाऱ्या ट्रक क्र. एमएच २८ एपी ७८०५ हा पेट्रोल पंपाजवळ आला असता शौचास जाण्याकरिता मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला होता. नागपूर येथे केली घेऊन जाणारा ट्रक क्र.एम एच २७ बी एक्स ३३०६ च्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत धडक देण्याऱ्या ट्रकचा दर्शनी भागाचा चुराडा झाला, तूर भरलेल्या उभ्या ट्रकचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जबर धडक बसल्याने ट्रकचे मागील चाके निसटून टायरसुद्धा फुटल्या गेले आहे. मृत मुकेश दिनेश करुले याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे. फिर्यादी बंडू मुखदेव घाटे (४०) यांच्या तक्रारीवरून आरोपी देवानंद सोनार (४०, रा. टाकरखेडा मोरे, ता अंजनगाव सुर्जी) विरुद्ध भादंविचे कलम २७९, ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर वाहकाला शौचास जाणे जिवावर बेतले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी, मिलिंद चौधरी, पोलीस कॉस्टेबल निरंजन उकंडे करीत आहे.