प्रदीप भाकरे, अमरावती : सहायक उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करतेवेळी एक तोतया महिला उभी करून मुळ मालक असलेल्या महिलेच्या प्लॅाटचा परस्परच विक्री व्यवहार करण्यात आला. बनावट कागदपत्रांच्या आधारावर भूखंडाची विक्री करून फसवणूक करण्यात आल्याची ही घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत ७ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.
गणपत भलावी (रा. कुऱ्हा) व नीलेश ठाकरे (रा. रहाटगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या दोघांनी मूळ मालक असलेल्या एका महिलेच्या जागेवर दुसरीला उभे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या भूखंडाची विक्री केली. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. १४ सप्टेंबर २०२१ रोजी तो प्रकार घडला होता. येथील एका महिलेने गंगा सावित्री नगर या जागेवर १८८३ चाैरस फुट प्लॉट खरेदी केला. शंकर थोरात व सुभाष घुगे यांच्याकडून तो प्लॉट विकत घेतल्यानंतर महिलेने त्या प्लॉटची सहायक निबंधक कार्यालयात रितसर नोंदणी देखील केली. दरम्यानच्या काळात ओळखीतील गणपत भलावी या आरोपीने महिलेला त्या प्लॉटबाबत मानसिक त्रास दिला. त्यामुळे महिलेने त्याच्याविरूध्द न्यायालयात दाद देखील मागितली.
खोटे ओळखपत्रही :
दरम्यानच्या काळात गणपत भलावी व निलेश ठाकरे यांनी मुळ मालक असलेल्या महिलेच्या जागेवर अज्ञात स्त्री उभी केली. तथा महिलेच्या खोट्या स्वाक्षऱ्या व खोटे ओळखपत्र तयार केले. तथा महिलेच्या ताब्यातील प्लॉटची परस्पर विक्री केली. काही दिवसांनी तो प्रकार महिलेच्या लक्षात आला. तिने सहायक निबंधक व तलाठी कार्यालय गाठून चौकशी केली असता, फसवणुकीचा प्रकार उघड झाला.