ॲप डाउनलोड करण्यासाठी बांधावर जाऊन जनजागृती, महसूल विभागाचा उपक्रम
टाकरखेडा संभू : ई-पीक पाहणी अंतर्गत शेतकऱ्यांना स्वत:च त्यांच्या पिकांची माहिती ई-पीक पाहणी ॲपमध्ये समाविष्ट करावयाची आहे. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तहसीलदारांच्या नेतृत्वात भातकुली तालुक्यातील शिवारांमध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांना ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या पिकाची माहिती कशी भरावी, याचे मार्गदर्शन केले जात आहे.
क्षेत्रीय स्तरावरून पीक पेरणी अहवालाचा रिअल टाईम क्रॉप डेटा संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा डेटा संकलित करताना पारदर्शकता, पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग, सुलभ कृषी पतपुरवठा, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची सुलभ प्रक्रिया, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य मदत करणे शक्य व्हावे आदी उद्देशाने पीक पेरणीबाबतची माहिती भ्रमणध्वनीवरील ॲपमध्ये नोंदविण्यासाठी टाटा ट्रस्टने आज्ञावली विकसित केली आहे. अंमलबजावणीसाठी भातकुली तालुकास्तरीय समिती गठित करून तहसीलदारांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले जात आहे.
बॉक्स
ही आहे समिती
समितीच्या अध्यक्षपदी उपविभागीय अधिकारी आहेत. सहअध्यक्ष म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी, सदस्यपदी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि अग्रणी बँक व पीक विमा कंपनीचे तालुकास्तरावरील प्रत्येकी एक प्रतिनिधी यांचा समावेश आहे,
बॉक्स
शेतकऱ्यांनी पुढे येऊन शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमाला प्रतिसाद द्यावा व आपली पीक नोंदणी स्वतः करून घ्यावी.
- नीता लबडे, तहसीलदार, भातकुली