अमरावती : गेल्या २४ तासांत शहर आयुक्तालय हद्दीत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. त्या नऊही प्रकरणांत बडनेरा, फ्रेजरपुरा, गाडगेनगर तथा नांदगाव पेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. पैकी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, तर दोघा अपघातग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाले. गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
अंजनगाव बारी येथील नीलेश धांडे (३८) याने अंजनगाव बारी ते बडनेरा मार्गावरील अडगाव रोडवरील तेलाई मंदिराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ११ जून रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना उघड झाली. बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली, तर महादेवखोरी परिसरातील बागडे ले-आऊटमधील आशिष सगणे (३३) याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ११ जून रोजी दुपारी ही घटना घडली. अपघातामुळे त्याच्या कमरेत प्लेट टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे तो त्रस्त होता. यापूर्वीदेखील त्याने दोन तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, कुटुंबातील सदस्य मरणाच्या चौथ्यावर गेले असता आशिषने घरात पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली, तर जुनी नवसारी येथील पुरुषोत्तम गुणाजी टेंभुर्णे (६७) यांनी मूळव्याधीच्या त्रासाला कंटाळून कोंडवाड्यातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन ईहलीला संपविली. ११ जून रोजी पहाटे ५ च्या सुमारास ही घटना उघड झाली. मृताच्या पत्नीला ते दिसले नाहीत म्हणून त्यांनी मुलाला उठविले, तर पुरुषोत्तम हे वायरच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
गतिरोधकाहून कोसळून मृत
गौरी इन हॉटेलच्या थोड्या समोर असलेल्या गतिरोधकाहून उसळून झालेल्या अपघातात एमएच २७ सीएच ६२०३ क्रमांकाच्या दुचाकीच्या चालकाचा मृत्यू झाला. ११ जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघड झाली. मृताची ओळख पटू शकली नाही. नांदगाव पेठ पोलिसांनी त्याला रक्तबंबाळ स्थितीत इर्विनमध्ये दाखल केले होते, तर दगडावरून गेलेली दुचाकी अनियंत्रित होऊन रुग्णवाहिकेला धडकल्याने दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष पवार (४२, न्यू आदिवासी कॉलनी, रहाटगाव) असे मृताचे नाव आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी ११ जून रोजी रात्री आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
बडनेऱ्यात झोपेतच मृत्यू
पाठ्यपुस्तक मंडळाजवळील श्रीकृष्णनगरचे रहिवासी संदीप बाभूळकर (३३) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ११ जून रोजी रात्री ७.५० च्या सुमारास ती घटना उघड झाली. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला. विलासनगर येथील निर्मला रामभाऊ ठाकरे (५६) यांचा ११ जून रोजी सायंकाळी इर्विनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर बडनेरा येथील पंचशीलनगर येथील चंदू कांबळे (५५) हे घरातच मृत आढळले. ११ जून सायंकाळच्या सुमारास ही घटना उघड झाली. चंदू कांबळे हे सकाळपासून उठलेले नाहीत, या माहितीवरून शेजाऱ्याने त्यांना उठवायचा प्रयत्न केला असता, ते मरण पावल्याचे दिसून आले.
हर्षराज कॉलनीत संशयास्पद मृत्यू
हर्षराज कॉलनी येथील पद्माकर राऊत (५४) यांचा कुजलेला मृतदेह त्यांच्याच घरातील पाण्याच्या टाक्यात आढळून आला. ११ जून रोजी सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघड झाली. गाडगेनगर पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असली तरी घात की अपघात, याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या तरुण मुलाचा जाबदेखील नोंदविला जाणार आहे.