अमरावती : मान्सूनने सर्वत्र महिनाभर उशिरा हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी दोनपासून विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर दमदार हजेरी लावत त्याने नंदनवन ओलेचिंब करून सोडले. सुखावह असा हा मान्सूनचा पहिला पाऊस जबरदस्त बरसला.
मान्सूनचे आगमन आज होईल, उद्या होईल, या अपेक्षेत अखेर शुक्रवारी झालेच. बळीराजासह सर्वच त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. विदर्भाच्या नंदनवनात तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दोन दिवसांआड सुरू झाला होता. पावसाच्या आगमनाने घनदाट अरण्यातील नदी-नाले खळखळून वाहायला सुरुवात झाली आहे. संततधार बरसल्याने वन्यप्राण्यांचासुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
नंदनवनात शुभ्र धुके, शहर हरविले
पावसाच्या आगमनासोबतच पांढरेशुभ्र धुके शुक्रवारी दुपारी दोनपासूनच विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर पसरले होते. त्यामुळे दिवसाही वाहनधारकांना घाटवळणातून वाहनांचे दिवे लावून काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करावे लागले. आता काही दिवसांतच परिसरातील सातपुड्याचे उंच डोंगर हिरवा शालू पांघरणार आहेत.
परतवाडा, अचलपुरात पाऊस
दुपारी चारपासून अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात दमदार पावसाने हजेरी लावली. सोबतच परतवाडा-अचलपूर शहरातसुद्धा पावसाने आगमन केले. अमरावती शहरासह जिल्ह्यातील टाकरखेडा शंभू, हिवरखेड, शिरसगाव कसबा परिसरातही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच भागांत कमी-अधिक भागात तो बरसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.