अमरावती : पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. सद्य:स्थितीत ९४ गावांची तहान अधिग्रहित केलेल्या ४१ बोअर व खासगी ६८ विहिरींवर भागविली जात आहे. याशिवाय तहानलेल्या गावांसाठी १७ टँकर सुरू आहेत.
मागच्या हंगामात सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे मार्चपश्चात सर्व तालुक्यातील भूजलात मोठी तूट आलेली आहे. अशा परिस्थितीत अनेक गावांंमधील जलस्रोत कोरडे पडल्याने पाणीपुरवठ्याच्या योजना कुचकामी ठरल्या आहे. त्यातच पाणीटंचाई निवारणार्थ योजना आचारसंहितेत रखडल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. त्यावर तात्पुरत्या उपाययोजनांची मात्रा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे देण्यात आली आहे. शिवाय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एसडीओ यांना टँकर लावण्याचे अधिकार दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या सोमवारच्या अहवालानुसार अमरावती तालुक्यात १०, नांदगाव खंडेश्वर १७, मोर्शी १४, धारणी १०, चिखलदरा १९, तिवसा ७, भातकुली १, चांदूर रेल्वे ३, धामणगाव रेल्वे २ व अचलपूर तालुक्यात ३ गावांमध्ये अधिग्रहण केलेल्या ६८ विहिरी व ४१ बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
चिखलदरा तालुक्यात १६ टँकर सुरूजिल्ह्यात सर्वाधिक १६ टँकर चिखलदरा तालुक्यात सुरू आहेत. यामध्ये खडीमल गावात ४, आलाडोह २, बेला, मोथा, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौरखेडा बाजार, लवादा, गवळी ढाणा, स्कूल ढाणा व कालापेंढरी गावात प्रत्येकी एक टँकर सुरू आहेत. याशिवाय चांदूर रेल्वे तालुक्यात सावंगी मग्रापूर येथे १ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.