अमरावती : महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये मुख्यालयातील सर्व विभागप्रमुखांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. मात्र, ते सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत की बंद, ते कुणालाही माहीत नाही. कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सज्ज केलेल्या दालनातील फुटेज दाखविणारी, संकलित करणारी यंत्रणाच उभारण्यात आली नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा लावा, मात्र, विभागप्रमुख दिसू देऊ नका, अशी विनंती तर करण्यात आली नाही ना, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सिस्टिम मॅनेजरनुसार, विभागप्रमुखांच्या दालनातील कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग आयुक्तांच्या पीएंच्या कक्षात देण्यात आले. प्रत्यक्षात त्यांच्या दालनातील लाईव्ह लोकेशन दिसेल, असे मॉनिटर तेथे नाही. अडगळीत एक स्क्रिन लावण्यात आली. ती बंद असल्याने ते मॉनिटर विभागप्रमुखांच्याच दालनाचे मॉनिटरिंग करते की कसे, हे यंत्रणेला देखील माहीत नाही. प्रत्यक्षात कॅमेरे लावून ठेवा, मग कोण बघतो, असा विचार करून त्याची जोडणीच नेटवर्किंगमध्ये करण्यात आली नसल्याचा धक्कादायक प्रकार पालिकेत उघड झाला आहे. आपली केबिन साहेबांना दिसत नाही, याचा आनंद काही औरच असल्याची प्रतिक्रिया एका विभागप्रमुखांनी दिली.
पीएच्या केबिनमधील कॅमेरा बंद
महापालिका आयुक्तांचे पीए व त्यांच्या कक्षात कोण बसलेत, हे दिसू नये, यासाठी केबिनच्या अडगळीत कॅमेरा लावण्यात आला आहे. मात्र, तो कॅमेरा सुरू आहे की कसे, हे खुद्द सिस्टिम मॅनेजर देखील सांगू शकले नाहीत. जर तो कॅमेरा सुरू असेल, तर अक्षय नामक कंत्राटी स्टेनो खुर्चीवर बसून दार आडवे केल्यास तो कॅमेरा ‘अनव्हिजिबल’ होतो. त्यामुळे पीएच्या दालनात कोण आले, ते कळत नाही.
काय म्हणाले सिस्टिम मॅनेजर
सर्व विभागप्रमुखांच्या दालनात १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्याचा एनव्हीआर पीएंकडे ठेवण्याचे निर्देेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. ते मॉनिटरिंग होत आहे की कसे, हे पाहतो, अशी माहिती सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे यांनी दिली. प्रत्यक्षात पीएंच्या दालनातील वॉटर कुलरसमोर एक मॉनिटर ठेवल्याचे दिसून आले. मात्र, ते सुरू नाही, अशी माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली.
हे विभागप्रमुख दिसतच नाहीत
विभागप्रमुखांपैकी सिस्टिम मॅनेजर, शहर अभियंता, मुख्य लेखापरीक्षक, पर्यावरण अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहायक पशूशल्यचिकित्सक, एडीटीपींच्या दालनात असलेले कॅमेऱ्यातील फुटेज कुठेही दिसत नाही. त्यामुळे ते बंद तर करून ठेवण्यात आले नाहीत ना, की आपले दालन आयुक्तांना दिसू नये, यासाठी पीएच्या केबिनमधील एनव्हीआर बंद करून ठेवला असावा, अशी शंका घेण्यात पुरेसा वाव आहे.