अमरावती : स्थानिक महापालिकेची शेवटची आमसभा गुरुवारी वादळी ठरली. स्वच्छता कंत्राटाच्या मुद्द्यावर एमआयएमचे गटनेते अ. नाजिम हे बसपाचे गटनेते चेतन पवार यांच्या अंगावर धावून गेले. दोघांमध्ये प्रचंड शाब्दिक चकमक उडाली. काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून अनर्थ टळला. प्रचंड गदारोळात महापालिका आमसभा १५ मिनिटे तहकूब केली.
८ मार्च २०१७ रोजी अस्तित्वात आलेल्या विद्यमान महापालिका कार्यकाळातील शेवटची आमसभा होती. नवीन प्रभागपद्धतीप्रमाणे स्वच्छता कंत्राटदार नेमावेत, नवीन प्रभाग रचनेनुसार स्वच्छतेचे धोरण ठरवावे, या स्थायी समितीकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना चेतन पवार यांनी ‘कंत्राटदारांची वकिली’ ही शब्दप्रयोग केला. तो शब्द मागे घेण्यात यावा, अशी मागणी अ. नाजिम यांनी केली. त्यावर ‘हट्’ असे संबोधन करीत त्यांनी अ. नाजिम यांची सूचना अव्हेरली. त्यामुळेच अ. नाजिम हे चेतन पवार यांच्या अंगावर धावून गेले.
पवार यांनी प्रतिकार करीत स्वत:चा बचाव केला. यापूर्वी याच सभेत भाजप गटनेता तुषार भारतीय व माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्यात प्रचंड वादावादी झाली. भारतीय यांनी संपूर्ण सभागृह डोक्यावर घेऊन स्वपक्षीय चिमोटे यांना लक्ष्य केले.