अमरावती: अमरावती परतवाडा एसटी प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाची ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज असलेली पर्स लंपास करण्यात आली, ती बाब लक्षात येताच महिलेने वाहकाला बस थांबविण्याची विनंती केली. मात्र वाहकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्या महिलेला आर्थिक फटका बसला. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. येथील एक महिला लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी सोमवारी सायंकाळी पोटे चौकातून परतवाडा बसमध्ये बसली. मात्र एसटीत गर्दी असल्याने त्यांना उभे राहून प्रवास करावा लागला. त्यावेळी दोन महिला त्यांना धक्का देत होत्या. त्यांनी हटकले असता गाडीच्या झटक्यामुळे धक्का लागत असल्याची बतावणी त्या महिलांनी केली.
त्यावेळी त्यांच्याकडील पर्समध्ये मंगळसूत्र, चपला हार, कानातील झुमके, काळी पोत, डोरले व ४ हजार रुपये रोख असा एकुण ६९ हजारांचा एैवज होता. प्रवासादरम्यान, मेघनाथपूर फाट्यावर त्यांनी मोबाईल पाहण्यासाठी पर्स पाहिली असता, त्यातील पैसे व दागिणे असलेली पर्स दिसून आली नाही. त्यामुळे महिलेने वाहकाला चोरीची माहिती देऊन एसटी बस थांबविण्याची विनंती केली. मात्र एमएच १४ बीटी ४९७६ या बसच्या वाहकाने बस थांबविली नाही. ती पुढे चांदूरबाजार नाक्यावर थांबली असता अनेक प्रवासी उतरले. तर सदर महिला मिल कॉलनी स्टॉपवर उतरली. त्याचवेळी वाहकाने चालकाला सुचना देत एसटी थांबविली असती तर दागिणे, चोर सापडू शकले असते, अशी भावना महिलेने पोलिसांकडे व्यक्त केल्या. याप्रकरणी सरमसपुरा पोलिसांनी त्या ४५ वर्षीय महिला प्रवाशाच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला. आपले दागिने असलेली पर्स मेघनाथपूर फाट्यादरम्यान चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"