अमरावती : अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात सोमवारी पावसाने दिवसभर हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. तर वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे.
देवळी तालुक्यात १५ हजार हेक्टर शेतजमीन पुरामुळे वाहून गेली. तर आर्वी तालुक्यातही देऊरवाडा गावाला पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली असून सोमवारी हिंगणघाट तालुक्यात मनसावळी गावात यशोदा नदीच्या पुलावरून बैलबंडी वाहून गेल्याची घटना घडली. यात एका बैलाचा मृत्यू झाला.
गेल्या तीन दिवसांपासून पुरात वाहून गेलेल्या पाच इसमांपैकी एकाचाही मृतदेह अजून हाती लागलेला नाही. रविवारी यवतमाळ जिल्ह्यात पहाटे ८ पर्यंत सरासरी ११ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद वणी तालुक्यात करण्यात आली.