प्रदीप भाकरे,अमरावती : एका विधवा महिलेला लग्नाचे आमिष देत तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. तसेच पीडितेकडून तीन लाख रुपयेदेखील उकळले. मात्र, त्यानंतर लग्न करण्यास व पैसे देण्यास नकार देत आरोपीने काढता पाय घेतला. १५ ऑक्टोबर २०१५ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत ती लैंगिक व आर्थिक शोषणाची मालिका चालली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून १४ जून रोजी आरोपी महेंद्र दादाराव आठवले (३५, रा. देवळी, ता. अकोट, जि. अकोला) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी महिलेचे सुमारे २० वर्षांपूर्वी लग्न झाले. तिचा पती आजाराने मरण पावला. ऑगस्ट २०१४ मध्ये ती नागपूरहून अमरावती येथे येत असताना तिची आरोपी महेंद्रशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंधदेखील निर्माण झाले. अमरावती येथे ती भाड्याने राहत असताना त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. ती रूमवर एकटीच राहत असल्याने आरोपीने तिच्याकडे आठ दिवस मुक्काम केला.
त्या कालावधीतदेखील त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले. मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशी लग्न करणार आहे, असा विश्वास त्याने तिला दिला. आरोपी महेंद्र हा नेहमीच तिला भेटायला यायचा. त्यादरम्यान त्याने तिच्याकडून अनेकदा उसने पैसे घेतले. सन २०२२ पर्यंत सर्व काही सुरळीत सुरू असताना त्याने महिलेचे फोन कॉल उचलणे बंद केले. एवढेच काय, तर आरोपीने महिलेचा विश्वासघात करून दुसऱ्या मुलीशी लग्नदेखील केले.
फोन कॉल केल्यास पाहून घेईन-
दरम्यान, १२ जानेवारी २०२४ रोजी ती उसने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी महेंद्रकडे गेली. त्यावेळी त्याने रंग बदलला. यापुढे जर तू मला फोन कॉल करून पैसे मागितले, तर मी तुला पाहून घेईन, अशी धमकी त्याने दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी महेंद्र आठवले हा सन २०१५ते सन २०२२ पर्यंत आपल्याकडून तब्बल तीन लाख रुपये घेऊन गेल्याचेही पीडितेने म्हटले आहे. आपली लैंगिक व आर्थिक शोषण फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने १४ जून रोजी राजापेठ पोलीस ठाणे गाठले व रीतसर तक्रार दाखल केली.