लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील अकोली स्मशानभूमीलगत गुरुवारी दुपारी आढळलेल्या विना शिर मृतदेहाची ओळख पटविण्यात शहर पोलिसांना यश आले. मृताच्या खिशात आढळलेली तंबाखूची पुडी 'मेड इन परतवाडा' असल्याने पोलिसांनी तपासचक्रे हलविली आणि अवघ्या २४ तासांत शिर नसलेल्या त्या मृतदेहाची, खुनाची घटनेची यशस्वी उकल केली. दुर्योधन बाजीराव कडू (६३, रा. भूगाव, ता. अचलपूर) असे मृताचे तर, निकेतन रामेश्वर कडू (२९, रा. भूगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.
दुर्योधन कड्डू यांचे शिर येथील अकोली रोड भागात सत्तुराने धडावेगळे करून ते आसेगाव पूर्णालगतच्या पूर्णा नदीच्या पात्रात फेकल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट -१ व स्पेशल स्कॉडचे अधिकारी आरोपीला घेऊन शुक्रवारी रात्री आसेगावात पोहोचले. रात्री ८:३० च्या सुमारास पोलिसांनी टाकरखेडा पूर्णास्थित पूर्णा नदीपात्राच्या पुलाच्या काठावरील बंगाली बाभुळबनातून मृताचे धडावेगळे केलेले शिरदेखील ताब्यात घेतले. तत्पूर्वी गुन्हे शाखेने संशयित आरोपी म्हणून निकेतन याला सरमसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्याने चौकशीदरम्यान दुर्योधन यांचे शिर अमरावतीहून आसेगावला नेले व ते पूर्णा नदीपात्रात टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर मृत दुर्योधन कडू यांचे शिर शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. त्याचा उलगडा करण्यात पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव व आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वातील पोलिस पथक अवघ्या काही तासात यशस्वी झाले.
निकेतन हा सैन्यात कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी दुर्योधन कडू यांच्याकडून त्याने पाच लाख रुपये उसनवार घेतले होते. काही दिवसांपासून त्यांनी निकेतनकडे पैशासाठी तगादा लावला होता. त्यातून सुटण्यासाठी आपण त्यांना गुरुवारी अमरावतीत आणले व त्यांचे शीर धडावेगळे करून त्यांचा खून केल्याची माहिती निकेतनने पोलिसांना दिली. सरमसपुरा ठाण्यात दुर्योधन कडू यांच्याबाबत मिसिंग तक्रार दाखल होती. त्यातून तपासाला दिशा मिळाली. यादरम्यान अमरावतीत एक अज्ञात मृतदेह सापडल्याची माहिती दुर्योधन यांच्या नातेवाइकांना मिळाल्याने तेदेखील सरमसपुरा व नंतर अमरावतीत आले होते. अकोली रोडवरील स्मृती विहार कॉलनीजवळील यादव यांच्या वाडीतील तारेच्या कंपाऊंडजवळ तो शिर नसलेला मृतदेह २८ नोव्हेंबर रोजी दुपारी आढळून आला होता. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी ललित गोळे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. निकेतन व दुर्योधन कड्डू हे गुरुवारी सकाळी भूगाव येथे सोबत पाहिले गेले. आरोपीने खुनासाठी अमरावती का निवडले, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे. सीपी नविनचंद्र रेड्डी व डीसीपीद्वय गणेश शिंदे व कल्पना बारवकर यांच्या नेतृत्वात ही कामगिरी फत्ते झाली.
पोलिसांकडे होते दोन क्ल्यू मृताच्या पायजामाच्या खिशात सूर्य छाप भस्कापुरी तंबाखूची पुडी व चुन्याची हिरवी डबी आढळली. त्यावरून पोलिसांनी तो तंबाखू कुठल्या भागात खाल्ला जातो, ते प्रॉडक्शन कुठले, याचा शोध घेतला. त्या तंबाखूच्या पुडीवर 'मेड इन परतवाडा' असे नमूद होते. पोलिसांनी ग्रामीण कंट्रोल रूमला त्याबाबत माहिती दिली. मिसिंगदेखील शोधले. त्यावेळी दुर्योधन कडू हे गुरुवार सकाळपासून घरून बेपत्ता झाल्याची तक्रार सरमसपुरा ठाण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोलिस पोहोचले. तेथून निकेतनचा सुगावा लागला. याशिवाय मृताच्या अंगावर तीन बटनचा शर्ट, पायजामा असल्याने मृत व्यक्ती ग्रामीण भागातील रहिवासी असावा, हेदेखील पोलिसांनी हेरले.
"अकोली रोड परिसरात मुंडक्याविना आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याने खुनाची कबुली दिली. आसेगाव पूर्णा येथील नदीपात्राशेजारून मृताचे शिर ताब्यात घेण्यात आले. यात खुनाचा पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्यात येईल." - जयदत्त भंवर, - सहायक पोलिस आयुक्त