अमरावती :जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचा सपाटा गत काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयात चार डेप्युटी सीईओंसह, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे सध्या झेडपीत एचओडींच्या बदलीमुळे आऊट गोइंग जोरात सुरू असले तरी या रिक्त पदावर कुणाचीही नियुक्त केली नसल्याने इन्कमिंग बंद असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेची ग्रामविकासातही महत्त्वाची भूमिका आहे. असे असताना या संस्थेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पद गत काही महिन्यापासून रिक्त आहे. याशिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध साथरोगाचा धोका असतो. यामुळे आरोग्य विभागाची जबाबदारी अधिक वाढते. अशातच काही दिवसांपूर्वीच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांचीही बदली झाली आहे. त्यामुळे या विभागाचेही कामकाज प्रभारी अधिकाऱ्यावर भागविले जात आहे.
अशातच काही महिन्यांपूर्वी रोजगार हमी योजना विभागाचे डेप्युटी सीईओ प्रवीण सिन्नारे यांचीही बदली झाली आहे. त्यामुळे रोहयोमधील पद रिक्त आहे. पाणीपुरवठा विभागाचे डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी यांची चांदूर रेल्वे पंचायत समितीत बीडीओ पदावर बदली झाली आहे. १७ जुलैला सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे यांची येथीलच विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त तपासणी या पदावर बदली झाली आहे, तर पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ गिरीश धायगुळे यांची चंद्रपूर येथे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली झालेली आहे.
एकंदरीत जिल्हा परिषदेत आतापर्यंत सहा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सध्याच्या स्थितीत प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, रोहयो डेप्युटी सीईओ या पदाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपविला आहे, तर स्वच्छता व पाणी पुरवठा, पंचायत, सामान्य प्रशासन या विभागाच्या खातेप्रमुख यांच्या बदल्यांचे आदेश धडकले आहेत.