अमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये १,१०३ नागरिकांना सर्पदंश झाला असून, दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाल्याची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे. या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात रोज सरासरी सहा तर चार तासांत एका नागरिकाला सर्पदंश होत असल्याचे दिसून येते. सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात आहेत; परंतु, स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशावरील उपचार न करताच रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पावसाचे पाणी बिळांमध्ये घुसल्याने साप बाहेर येतात. त्यामुळे सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात घडतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रामध्येही सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे पुरविण्यात येतात. परंतु, बहुतांश आरोग्य केंद्रांत उपचाराच्या सुविधा असतानाही येथील डॉक्टर उपचार न करताच संबंधित रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात रेफर करीत असल्याने उपचार मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे.