लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेहुण्याशी वाद का घातला, याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या दोन जावयांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास गुलिस्तानगर स्थित मशिदीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फिरोजखान अफसरखान (३५, रा. गुलिस्तानगर) असे मृताचे नाव आहे, शेख मुनज्जर शेख बार असे जखमीचे नाव आहे. नागपुरी गेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजखानचा मेहुणा शेख जबीर शेख खलील हा त्याच्या आईला घेऊन दवाखान्यात जात असताना काही अंतरावर एक ऑटोरिक्षा समोर आली. त्यामुळे शेख जबीर थांबला. त्याचवेळी आरोपी शाकीर खान जाकीर खान (२१) व सोहेल खान फिरोज खान (१९, दोघेही रा. गुलिस्तानगर) हे त्याच्या मागे होते. त्यावेळी दोन्ही आरोपींनी दुचाकी समोर काढण्याच्या कारणावरून शेख जबीरला शिवीगाळ केली. त्याच्याशी हुज्जतदेखील घातली. मात्र, वाद न घालता शेख जबीर हा तेथून आईला घेऊन दवाखान्यात गेला. काही वेळाने ही बाब शेख जबीरचा जावई फिरोजखानला समजली. आरोपी हे एकाच मोहल्ल्यातील असल्याने नेमके काय घडले व समजावण्यासाठी फिरोजखान हा साडू शेख मुनज्जरला घेऊन गुलिस्तानगरमध्ये पोहोचला. दरम्यान, आरोपी हे त्याच परिसरातील एका मशिदीजवळ असल्याचे त्यांना समजले. परिसरातील एका शौचालयाजवळ फिरोजखानला दोन्ही आरोपी दिसले. त्यावेळी त्यांना विचारणा केली असता, शाकीर खान हा फिरोजखान व शेख मुनज्जरच्या मागे चाकू घेऊन धावला. शेख मुनज्जरने चाकूचा वार चुकवत तेथून पळ काढला, तर फिरोजखान हा जीव वाचवत पळत असताना शाकीर खानने त्याच्यावर हल्ला केला.
उपचारादरम्यान मृत्यूगंभीर जखमी स्थितीत फिरोजखान हा त्याच भागातील एका घराजवळ कोसळला. तितक्यात सोबत असलेला साडू तेथे पोहोचला. त्यांनी दुचाकीने फिरोजखान याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे काही वेळातच फिरोजखानचा मृत्यू झाला.
साल्याशी वाद का घातला, अशी विचारणा करण्यासाठी व समजावण्यासाठी गेलेल्या दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. पैकी एकाचा मृत्यू झाला. दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तपास सुरू आहे. पैकी मुख्य आरोपी शाकीर खानला अटक करण्यात आली. पु्ंडलिक मेश्राम, ठाणेदार, नागपुरी गेट