अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेला जिल्हा हा डाग पुसल्या जाणार, असे चिन्हे आहेत. यंदाच्या तीन महिन्यात ५२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नैराष्यावर संघर्षाने मात केल्याने जिल्ह्यात सकारात्मक चित्र समोर आले आहे.
राज्यात दोन वर्षाचा आढावा घेता सर्वधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा, अशी अमरावती जिल्ह्याची झालेली ओळख दुदैवी आहे. सरासरी दर २० तासात एक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात होत असल्याच्या चित्राला यंदा छेद दिल्या गेला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आता सकारात्मक बदल होताना दिसतो. यासाठी प्रशासकीय स्तरावरुन फारसे काही प्रयत्न झाले आहे, असे नाही. शेतकऱ्यांच्याच नैराष्यावर संघर्षाने केलेली मात, यामध्ये ठळकपणे उठून दिसत आहे.
जिल्ह्यात २२ वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची नोंद प्रशासनस्तरावर घेतल्या जात आहे. याकाळात सावकारी व बँकांचे कर्ज, कर्जाचे वसुलीसाठी तगादा, सलग नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आजारपण, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदी समस्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येऊन आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झालेली होती. शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी काही योजना दिल्या परंतू या योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी हे अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत.