नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत दोन माता व शून्य ते सहा वयोगटातील ७७ व ३३ उपजत अशा ११० बालकांचा मृत्यू झाला. धारणी उपजिल्हा रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
आदिवासी नागरिकांनी बालकांचा उपचार कुठे करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुपोषणाच्या तीव्र श्रेणीत २३२ बालके असताना १४ ‘ब’ गट डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचा संतापजनक प्रकार आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, न्यायालयाचे ताशेरे पाहता मृत्यूची आकडेवारी कमी होत नसल्याचे चित्र आहे.
या ११० मृत्यूंपैकी सर्वाधिक ३६ बालकांचा मृत्यू ऑगस्ट महिन्यात झालेला आहे. या कालावधीत दोन माता मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे. आदिवासी बांधवांवर अंधश्रद्धेचा पगडा असल्याचे वारंवार सांगितले जाते. आता रुग्णालयातही बालमृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे वास्तव आहे.
शून्य ते सहा वयोगटात ७७ बालकांचा मृत्यू
मेळघाटात पाच महिन्यांत शून्य ते सहा वयोगटातील ७७ बालकांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात २,५२५ बालकांचा जन्म झाला. त्यापैकी शून्य ते सहा वयोगटातील २७ बालके दगावली आहेत. धारणी येथे उपजिल्हा रुग्णालयात १९ व टेब्रुसोंडा आरोग्य केंद्र अंतर्गत शून्य ते सहा वयोगटातील सहा बालके दगावली आहेत.
पाच महिन्यात ३३ बालके मृत जन्मली
आरोग्य विभाग शून्य ते सहा वयोगटातील आकडेवारी सांगत असला तरी मृत जन्मलेल्या बालकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. पाच महिन्यात ती ३३ आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ बालके मृत जन्मल्याने राज्य शासनाचा पोषण आहार व इतर योजना कुचकामी ठरल्या आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत बालमृत्यूची संख्या कमी आहे. ऑगस्ट महिन्यात ० ते ६ वयोगटातील २७ व उपजत नऊ बालकांचा मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. ‘ब’ गट डॉक्टरांची १४ पदे रिक्त आहेत. शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे
दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती