चिखलदरा (अमरावती) : मेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा झाल्याचा प्रकार नवीन नाही. तालुक्यातील चुरणी ग्रामपंचायत अंतर्गत पलस्या येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी दुपारी १ वाजता गुरुजी वर्गखोलीत खुर्चीवर झोपले, तर विद्यार्थी त्यांच्या पुढ्यात धुमाकूळ घालत होते. हा प्रकार सरपंच, उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीच्या भेटीदरम्यान उघडकीस आला. या समितीलाच तुम्ही कोण, असा जाब गुरुजींनी विचारला आणि मग पंचनामा झाला. वरिष्ठांना कारवाईसाठी पाठविलेल्या अहवालात गुरुजी नशेत असल्याचा संशयही वर्तविण्यात आला आहे.
चुरणीचे सरपंच नारायण नंदा चिमोटे, उपसरपंच आशिष टाले, सदस्य निशा सतीश बछले व काटकुंभचे केंद्रप्रमुख एन. के. अमोदे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत पलस्या येथील जिल्हा परिषद शाळेला बुधवारी दुपारी १ वाजता गटशिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रमोद जावळे खुर्चीवर झोपलेले आढळून आले. बुटीदा शाळेवरून त्यांची प्रतिनियुक्ती पलस्या येथील शाळेवर करण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थी वर्गखोलीत व पटांगणात धिंगाणा घालत खेळत होते. हा प्रकार पाहून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य अवाक् झाले. त्याचे चित्रीकरण केल्यानंतर गुरुजींना झोपेतून उठविले गेले.
विद्यार्थ्यांच्या माकडचेष्टा; गुरुजी नशेत?
झोपलेले गुरुजी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हलकल्लोळ करीत असताना वर्गखोलीत झोपून होते. त्यामुळे सरपंचांनी गुरुजी धुंद नशेत असल्याचा संशय पंचनाम्याच्या पत्रात वर्तविला आहे.