धारणी (अमरावती) : मेळघाटातील सातपुड्याच्या सर्वांत वरच्या टोकावर असलेल्या गोलाई, राणीगाव शेतशिवारात लागून असलेल्या धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रातील बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. चार दिवसांआधी गोलाई येथील मकाच्या शेतात वासराची शिकार केली, तर शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास पुन्हा एका वासराची शिकार केली. नागरिकांचा रोष पाहता वनविभागाने गावात बैठक घेऊन दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे.
मेळघाटातील गोलाई व राणीगाव हे गाव व शेतकऱ्यांची शेती ही अकोट व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, प्रादेशिक वनविभाग व धूळघाट वनपरिक्षेत्र या चार वनविभागाच्या वनक्षेत्रालगत आहे. या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. एक महिन्यापासून एका बिबट्याने गोलाई राणीगाव शेतशिवारासह गावालगत वावर करून पाळीव प्राण्यांवर हल्ला केला. त्यामध्ये रामजी डाई यांच्या दोन बकऱ्या, शेख पाशा शेख चांद यांची एक म्हैस, तर चार दिवसांआधी नागनाथ डाबकर यांच्या शेतात वासराची शिकार केली.
शनिवारी रात्री आठ वाजता त्याच शिवारात जवळ असलेल्या लहू विनायक मुंडे यांच्या शेतात वासराची शिकार केली. याबाबत धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. वनविभागाने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅप कॅमेरे लावले असता नागनाथ डाबकर या शेतकऱ्यांच्या मका पिकाच्या शेतात गाईच्या वासराची शिकार करताना आढळून आला होता. नागरिक व वनविभागात संघर्ष निर्माण होऊ नये, याकरिता पुन्हा शिकार झाल्यानंतर रविवारी सकाळी गावात वनविभाग व नागरिकांची समन्वय बैठक पार पडली.
बैठकीला धूळघाट रेल्वे परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक निकम, वनपरिक्षेत्र अधिकारी पंकज अळसपुरे, वनपाल डांगे, वनपाल सिद्धेश्वर मुंडे यांच्यासह सरपंच दिनेश मवस्कर, पोलिस पाटील मोतीराम मावसकर, तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी मुंडे, गजू गिते, लहू मुंडे, सुधाकर गुटे, गणेश मुंडे, नारायण कटकडे, सदस्य नवल पतोरकर, जगन्नाथ डाबकर, नवनाथ गुटे, कोंडीराम मुंडे आदी नागरिक उपस्थित होते. वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी दोन दिवसांचा अवधी मागितल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
परतवाडा येथील रेस्क्यू टीम गोलाईत
परतवाडा येथील वनविभागाची रेस्क्यू टीम गोलाई गावात दाखल झाली आहे. त्यांनी दोन ठिकाणी पिंजरे लावले. आरएफओ पंकज अळसपुरे यांची १५ वनकर्मचारी व गार्डची चमू शेतकऱ्यांचे शेत व परिसरातील जंगलात गस्त व बिबट्याच्या बंदोबस्ताकरिता गोलाई गावात पोहोचली आहे.
बिबट्याने पुन्हा एका वासराची शिकार केली आहे. त्यामुळे गावात नागरिकांशी संवाद साधला. रात्री शेतात न जाण्यास व जनावरे न ठेवण्यास बजावले आहे. लवकरच बिबट्याचा बंदोबस्त करू
- पंकज अळसपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, धूळघाट रेल्वे