अमरावती : जुलैअखेरपासून काही तालुक्यांमध्ये पावसाचा खंड असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात चिंतेचे ढग दाटले आहे. अशा स्थितीत पश्चिम विदर्भातील ४० पेक्षा अधिक महसूल मंडळांमध्ये पावसाचा २१ दिवसांपासून खंड असल्याने तालुका समितीद्वारा पाहणी सुरू झाली आहे. या मंडळांमधील सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी अधिसूचना काढणार आहेत. ती पीकविमा कंपनीसाठी बंधनकारक आहे.
पेरणीच्या सुरुवातीला पावसाचा विलंब, त्यानंतर जुलैमध्ये अतिवृष्टीने आठ लाख हेक्टरमध्ये नुकसान व त्यानंतर ऑगस्ट महिन्यांपासून पावसात खंड यामुळे यंदाच्या खरिपाची वाट लावली आहे. पिकांची वाढ खुंटली. पिके करपायला लागल्याने उत्पादन खर्च निघणार की नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
स्थानिक प्रतिकूल परिस्थिती या निकषामध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास शेतकऱ्यांना पीकविम्याचा अग्रीम मिळतो. यासाठी पीकविमा कंपनीचा प्रतिनिधी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक यांची समिती बाधित मंडळात पिकांचे नजर अंदाज सर्वेक्षण करीत आहेत. समितीच्या अहवालानंतर ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महसूल मंडळात पीकविम्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
या मंडळांत पावसाचा खंड
यवतमाळ जिल्ह्यात अकोला बाजार, बोरी, शिवनी, कुरली, अमरावती जिल्ह्यांत भातकुली, निंभा, आसरा, पापळ, लोणी, दर्यापूर, थिलोरी, विहीगाव, बुलडाणा जिल्ह्यात जळगाव, जामोद, आसलगाव, संग्रामपूर, बावनबीर, पातुर्डा, जवळा, अकोला जिल्ह्यात आसेगाव, मालेगाव, पाथर्डी, बाळापूर, उरळ, निंभा, हातरुण, पातूर, घुसर, बोरगाव, पळसो, सांगळूद, कुरणखेड, धाबा, मूर्तिजापूर, हातगाव, निंभा, माना, जामठी, तर वाशिम जिल्ह्यात कामरगाव मंडळात पावसाचा २१ दिवसांचा खंड आहे.
पावसाचा खंड असल्याने काही भागांत पिकांना ताण आलेला आहे. त्या मंडळांमध्ये समितीद्वारा पीकपाहणी सुरू आहे. दरम्यान, आता काही भागांत पाऊस झालेला आहे.
- किसनराव मुळे, सहसंचालक (कृषी)