गजानन मोहोड
अमरावती : अस्मानी व सुलतानी संकटाने पिचलेल्या तब्बल ५४८ शेतकऱ्यांनी मागील सहा महिन्यांत मृत्यूला कवटाळले आहे. यंदा दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दाहक वास्तव आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी शासनाने अनेक योजना दिल्या. जागतिक बँकेच्या सहकार्यानेही काही प्रकल्प राबविले. यामध्ये खऱ्या व गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेलाच नाही, कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडल्याने या सर्व योजना आत्महत्या रोखण्यात कुचकामी ठरल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाचे अहवालानुसार यंदा जानेवारी महिन्यात ९५, फेब्रुवारीत १११, मार्च महिन्यात १००, मेमध्ये ८० व जून महिन्यात ६२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्यांचे वाढते सत्र वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.
सन २००१ पासून १८,२०८ आत्महत्या
शेतकरी आत्महत्याग्रस्त ११ जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी २००१ पासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. या कालावधीत पश्चिम विदर्भात ३० जून २०२२ पर्यंत १८,२०८ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. यापैकी अर्धेअधिक म्हणजेच ९,६४३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली तर ८,२९६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आली. अद्याप २६९ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.