लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०९ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये एकूण ६६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु १२,६६८ मतदारांना यापैकी एकही उमेदवार पसंत आला नाही. त्यामुळे त्यांनी 'नोटा' चा पर्याय वापरला होता.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक उमेदवाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, उमेदवार पसंत नसल्यासदेखील मतदाराने जाऊन मतदान करायला पाहिजे, यासाठी सन २०१४ च्या निवडणुकीपासून 'नोटा' (यापैकी कुणीही नाही) हा पर्याय मतदारांना उपलब्ध केलेला आहे. त्यामुळे मतदार बिनधास्तपणे जाऊन त्यांचा मतदानाचा अधिकार बजावू लागले आहेत व या प्रकारामध्ये काही टक्क्यांनी मतदान वाढले आहे.
नोटा हे वैध मतच आहे अलीकडे नोटाचा वापर निवडणुकीत कमी होत असल्याचे निवडणूक विभागाचे निरीक्षण आहे. गतवेळी जिल्ह्यातील सात मतदारसंघांत एक हजारपेक्षा अधिक मतदारांनी हा पर्याय निवडला होता तर धामणगाव रेल्वे मतदारसंघात एक हजारांच्या आत म्हणजे ७८८ नोटांचा वापर केला.
२० नोव्हेंबरला मतदान विधानसभेसाठी राज्यात २० ला मतदान व २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. स्वीप अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव, शहरात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय नवमतदारांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. त्यामुळे किमान ७० टक्के मतदान होण्याचा निवडणूक यंत्रणेचा अंदाज आहे.