अमरावती : राज्य परिवहन महामंडळाकडून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यासाठी ६८ ई-बसची मागणी वरिष्ठ स्तरावर नोंदविली आहे. यात पहिल्या टप्प्यात १० ते १५ बस मेअखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. मात्र, जून महिना अर्धा संपत येत असताना एसटी महामंडळाच्या ताफ्यात अद्यापही ई-बस दाखल झाल्या नाहीत.
एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास समजला जातो. त्यामुळे प्रवाशांची प्रवासासाठी पहिली पसंती ही एसटी बसला दिली जाते. ‘वाट पाहीन; पण एसटीने जाईन’ या मानसिकतेत असलेल्या प्रवाशांसाठी ई-बसमुळे बसचा प्रवास हा ध्वनि-वायू प्रदूषणमुक्त होणार आहे. वृद्धांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, तसेच महिलांपासून शाळकरी मुलींपर्यंत सर्वांनाच एसटी प्रवासात सवलत मिळत असल्याने एसटीची लालपरी सर्वांमध्ये लोकप्रिय आहे.
जिल्ह्यातील अमरावती, परतवाडा, मोर्शी आणि वरूड चार आगारांत चार्जिंग स्टेशननिर्मितीची निविदा प्रक्रिया होऊन आतापर्यंत या चार्जिंग स्टेशनचे विद्युत शाखा व सिव्हिल शाखेकडून अंतिम टप्प्यात आली आहे. ९० टक्के कामे आटोपली आहेत. दुसऱ्या टप्प्यात दर्यापूर, चांदूर रेल्वे आणि बडनेरा येथील चार्जिंग स्टेशनची कामे होणार आहेत. आता किती दिवस ई-बसची प्रतीक्षा करावी लागणार, हेही अद्याप अस्पष्ट आहे.