अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, बदली प्रक्रियेच्या अंतिम टप्यात प्रशासकीय बदल्याची कारवाई केली जाणार आहे. यात दिव्यांग, विधवा तसेच ५३ वर्षांवरील शिक्षकांना अवघड क्षेत्रात ( मेळघाट) मध्ये पदस्थापना देवून या भागातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ३६५ शिक्षकांचा समावेश आहे. अनेक सेवानिवृत्त होण्याच्या वाटेवर असलेल्या शिक्षकांसह, ज्यांनी आजपर्यंत मेळघाटात सेवाच बजाविली नाही.अशा शिक्षकांना आता मेळघाटात (अवघड क्षेत्र) पाठविण्याची तयारी शिक्षण विभागाने प्रशासकीय बदल्याच्या अनुषंगाने केलेली आहे. यामुळे ३६५ शिक्षकांची सध्या तरी झोप उडाली आहे.
शासनाने दिव्यांग, आजारी, विधवा तसेच ५३ वर्षावरील शिक्षकांसाठी संवर्ग १ तयार केला आहे. या शिक्षकांना बदलीतून सूट अथवा सोयीची बदली दिली जाते; परंतु यावर्षी ५३ वर्षावरील काही शिक्षकांनी बदली प्रक्रियेबदरम्यान नकार नोंदविला नाही. परिणामी, आता त्यांना अवघड क्षेत्रात जाण्याची वेळ आली आहे. काही शिक्षकांना सेवानिवृत्तीचा दोन ते चार महिन्यांचा कालावधी असतानाच आता अवघड क्षेत्रात जावे लागणार आहे.याशिवाय यापूर्वीच्या बदली प्रक्रियेत पतीची बदली झाली तर पत्नी प्रशासकीय बदलीस पात्र आहे.अशा शिक्षकांचा यात समावेश आहे. एवढेच नव्हे तर आजार असलेले,दिव्यांग शिक्षकांना अवघड क्षेत्रात जावे लागणार आहे.
अवघड क्षेत्र कोणते?
जिल्ह्यात शिक्षकांची बदली करण्यासाठी अवघड क्षेत्र ठरवून देण्यात आले. या अंतर्गत जिथे जाण्या- येण्याच्या सुविधा उपलब्ध नाहीत, इंटरनेट, मोबाइलसेवा उपलब्ध नाही, दुर्गम, डोंगर असलेल्या गावांचा अवघड क्षेत्रात समावेश होता. ...असे आहेत ३६५ शिक्षक
- मुख्याध्यापक - ३९
- गणित, विज्ञान शिक्षण - १०७
- भाषा शिक्षक - ६८
- सामाजिक शास्त्र शिक्षक - १२
- सहायक शिक्षक - १३९
बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा अन्यायकारक आहे.या पध्दतीने प्रशासकीय बदल्याची कारवाई होणार आहे.ही बाब अन्यायकारक आहे.एकीकडे शिक्षक भरती केली जात नाही.त्यामुळे रिक्त जागाही वाढत आहे. त्यामुळे शासनाने नवीन पदभरती घेऊन रिक्त असलेल्या जागा भराव्यात.
- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी प्राथमिक शिक्षक समिती