अमरावती: एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी कशी करायची हे संस्कार तुम्हाला कुठून घ्यायचे असेल तर ते भाजपकडून घ्यायचे. आणि धादांत खोटे आणि निर्लज्जपणे काही गोष्टी मांडायच्या असतील तर अमरावती शहरातल्या वाचाळ प्रवक्त्याकडून त्या शिकून घ्यायच्या. पत्रकार म्हणून काम केलेले राजकीय व्यक्ती आम्ही देखील बघितले आहे. मात्र एवढ्या खालच्या भाषेत एखाद्या सज्जन माणसाबद्दल लिहावे, जो की चांगला काम करतोय, पत्रकारितेचा हात पकडून निष्क्रिय पक्षात प्रवेश करीत स्वतला नेता म्हनविणारा स्वनामधान्य हा वाचळवीर म्हणजे समृद्ध आणि प्रगल्भ पत्रकारितेच्या वैचारिकतेलाच काळिमा फासणारा आहे असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केला आहे.
अमरावती शहरातील भाजप नेते व प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अतिशय शिवराळ भाषेचा वापर करीत निर्णय न घेणारा मुख्यमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विविध आरोप केले. त्यांच्या या आरोपांना शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी तोडीस तोड असे प्रत्युत्तर दिले आहे. शिवराय कुळकर्णी हे सध्याचा वाचाळ प्रवक्ता बिनबुडाचे आरोप मुख्यमंत्र्यांवर करीत आहेत. त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणेच अधिक चांगले ठरले असते. परंतू बाळासाहेबांचे संस्कार आणि उद्धव् ठाकरेंची शिकवण आम्हाला लक्षात असल्यामुळे आम्ही असे न करता अशा महावाचाळवीराला लेखीच उत्तर देणे आम्हाला योग्य वाटते असे खराटे यांनी म्हटले आहे. संघाची शिकवण असलेला माणूस एवढ्या खालच्या पातळीवर उतरून बोलतो म्हणजे नक्की एकतर संस्कारात खोट असावी किंवा व्यक्तीच चुकीचा असावा अशी खंत सुनील खराटे यांनी व्यक्त केली आहे.