हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती : धान्य महोत्सवात गर्दी, पशुधन-गोवंश प्रदर्शन, कृषी संस्कृती दर्शनअमरावती : कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने स्थानिक सायन्सकोर मैदानात रविवारी दुपारी ३ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आणि कष्टकऱ्यांच्या मांदियाळीत कृषी विकास प्रदर्शनी आणि कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विदर्भाच्या कानाकोऱ्यातून आलेल्या शेतकरी-कष्टकऱ्यांनी कृषी प्रदर्शनीतील विविध स्टॉलला भेटी देऊन कृषी विकासाच्या ‘टिप्स’ घेतल्यात. रविवारपासून सुरू झालेली ही प्रदर्शनी १३ एप्रिलपर्यंत राहणार आहे. कृषी, महसूल, जलसंधारणासह शासनाच्या विविध योजनांची माहिती या प्रदर्शनीतून दिली जात आहे. कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनानंतर शेतकऱ्यांची पावले धान्य महोत्सवाकडे वळलीत. विभागातील शेतकऱ्यांद्वारे उत्पादित धान्याची विक्री या धान्य महोत्सवातून होत आहे. शेतकऱ्यांच्या धान्याला थेट बाजारपेठ मिळावी या उद्देशाने शेतकरी स्टॉल लावून थेट ग्राहकांना धान्य विक्री करीत आहेत. याशिवाय बचत गट प्रदर्शनीत विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहाही जिल्ह्यांतील विविध महिला बचत गटांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. कृषी विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र शासन सहयोगाने या चार दिवसीय राज्यस्तरीय प्रदर्शनीत राष्ट्रीय कृषी प्रदर्शनासोबत कृषी संस्कृती दर्शन, पशूधन-गोवंश प्रदर्शन, शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती, विविध योजनांसंदर्भातील माहिती देण्यात येत असल्याने हे मैदान गर्दीने फुलले आहे. कार्यशाळेकडे शेतकऱ्यांची पाठअमरावती : कृषी विकास प्रदर्शनीमध्ये आयोजित कार्यशाळेमध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी हे ‘वनजमिनीपासून शेतकऱ्यांना होणारे फायदे’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर राजेश अडपावार हे ‘विदर्भातील पीक पद्धती आणि त्यामधील बदल व संधी’ या विषयावर त्रिलोक हजारे यांनी ‘जमिनीचे आरोग्य व माती परिक्षणाचे महत्व’ या विषयावर तर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ‘जलयुक्त शिवार अभियान एक यशस्वी कार्यक्रम व लोकांचा सहभाग’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ‘विदेशी भाजीपाला लागवड शेड-नेट व पॉली हाऊसमधील शेती ’ या विषयावर विजयकुमार कानडे तर ‘नवीन पिकाच्या रोपवाटीका एक फायदेशीर उद्योग’ या विषयावर वैभव उघडे व राजेंद्र जकाते यांनी मार्गदर्शन केले. मात्र या कार्यशाळेला बोटावर मोजण्याइतकी उपस्थिती होती.कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, कृषी विकास प्रतिष्ठानचे गिरीश गांधी, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, आ. रमेश बुंदेले, महापौर रिना नंदा, आ. सुनील देशमुख, आ. अनिल बोंडे, आ. श्रीकांत देशपांडे, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीराम काळे, कार्याध्यक्ष सोमेश्वर पुसदकर, कृषितज्ज्ञ सी. डी. मायी, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीत्ते, दिनेश बूब, विलास इंगोले, निवेदिता दिघडे, रामेश्वर अभ्यंकर आदींची उपस्थिती होती. व्यासपीठाला पद्मश्री भंवरलाल जैन कृषी व्यासपीठ असे नाव देण्यात आले आहे.
कष्टकऱ्यांच्या मांदियाळीत कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन
By admin | Published: April 11, 2016 12:03 AM