धामणगाव रेल्वे : येथील ग्रामीण रुग्णालयात खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या पुढाकाराने कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. येथे खासदार निधीतून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहे.
धामणगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार रामदास तडस यांच्याकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. आगामी काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना तातडीने सेवा मिळावी, याकरिता आरोग्य प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, असे निर्देश खासदार तडस यांनी दिले. रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाने तत्पर राहावे, असे आदेश आमदार प्रताप अडसड यांनी दिले आहेत. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर, पंचायत समिती सदस्य नरेंद्र रामावत, तालुका सरचिटणीस नितीन मेंडुले, नगर परिषद बांधकाम सभापती सुनील जावरकर, अनुराग मुडे, अशोक शर्मा, प्रफुल निस्ताने, गणेश ठाकूर, रवि जिचकार, गोपाल बाबरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.