लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : येत्या ९ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेले बेलोरा विमानतळाचे लोकार्पण म्हणजे निवडणुकीपूर्वीचे राजकीय 'टेकऑफ' असल्याचा घणाघात माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे.
लोकार्पणासाठी एमएडीसीकडून लगबग सुरू असली तरी अद्याप नागरी विमान वाहतूक संचालनालयाची परवानगी मिळाली नाही. शिवाय अत्यंत महत्त्वाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे कामही पूर्णत्वास आलेले नाही. त्यामुळे कामे अर्धवट असताना लोकार्पणाची घिसाडघाई केवळ निवडणुकीवर डोळा घेऊन घेतलेला निर्णय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पायाभूत सुविधा व औद्योगिक विकासात बेलोरा विमानतळ मैलाचा दगड ठरणार आहे. परंतु, होऊ घातलेले लोकार्पण अर्धवट विमानतळाचेच असून, केवळ टर्मिनल बिल्डिंगचे काम पूर्ण झाले आहे.
अपूर्ण असलेली कामे
- प्रवासी विमानांच्या परिचालनाकरिता सर्वात महत्त्वाचे असते ते एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर. विमानाचे लैंडिंग आणि टेकऑफ याचे संपूर्ण नियंत्रणच याद्वारे केले जाते. याचे कार्यान्वयन अद्यापही अपूर्ण आहे.
- देशातील सर्व विमानतळांचे नियमन करणाऱ्या नागरी विमान वाहतूक संचालनालय (डीजीसीए) या संस्थेची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्याची प्रक्रिया सुरू आहे.
- प्रवासी विमानाची सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपनीला या मार्गावर परवाना मिळाला आहे त्यांच्याकडून अद्यापही प्रस्तावित प्रवासी सेवेचा मार्ग, त्यांचे वेळापत्रक याबद्दल कोणतीही निश्चिती झालेली आहे.
- विमानतळ परिसरात हरीण, रोही यासारख्या जंगली प्राण्यांचा मोठा वावर आहे. हे सगळे प्राणी वनविभागाद्वारे रेस्क्यू करून दुसरीकडे शिफ्ट करण्यात येणार आहेत तेही काम अद्याप बाकी आहे. त्याशिवाय विमानांचे सुरक्षित टेकऑफ आणि लँडिंग शक्य होणार नाही.
"विमानाचे उहाणच जर होणार नसेल तर घाईघाईत विमानतळाचे लोकार्पण करणे म्हणजे अमरावतीकरांची फसवणूक करणे होय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ राजकीय लोकार्पण करणे एवढाच या मागचा उद्देश दिसतो."-डॉ. सुनील देशमुख माजी राज्यमंत्री