अतिरिक्त महानिदेशकांचे आदेश : प्रभारी पोलीस आयुक्तांची पाहणीअमरावती : नागपूर येथील कारागृहात पाच कैदी फरार झाल्यानंतर राज्यभरातील कारागृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याच श्रृंखलेत कारागृह प्रशासनाच्या अतिरिक्त महानिदेशकांनी अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे सुरक्षा 'आॅडिट' करण्याचे पोलिसांना कळविले आहे. त्यानुसार शनिवारी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनात अमरावती कारागृहाचे सुरक्षा 'आॅडिट' करण्यात आले. मात्र यात काही उणिवा असल्याचे पोलीस प्रशासनाच्या प्रथमदर्शनी लक्षात आल्याची माहिती आहे.शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरक्षा 'आॅडिट'ला प्रारंभ झाला. कारागृहाच्या आतील आणि बाहेरील भाग पिंजून काढताना प्रभारी पोलीस आयुक्त घार्गे यांनी सुरक्षेत येणाऱ्या उणिवा जाणून घेतल्यात. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासनाची विशेष शाखा, गुन्हे शाखेचे अधिकारी हजर होते. कारागृह हे मध्यवस्तीत असल्याने मागील बाजूने गेलेला राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता भविष्यात धोक्याची घंटा ठरणारी आहे. या वळण मार्गावरुन सध्या कारागृहाचा आतील भाग टिपता येत असल्याने कोणत्याही क्षणी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाहणीदरम्यान घार्गे यांच्या निदर्शनास आले आहे. विशेषत: कारागृहाचे तट वाढविण्यावर पोलीस प्रशासनाने भर दिला आहे. सुरक्षा यंत्रणेत कोणत्याही उणिवा राहता कामा नये, यासाठी प्रभारी पोलीस आयुक्त घार्गे यांना सुरक्षा 'आॅडिट' करण्याला प्राधान्य दिले आहे. कारागृहाच्या मुख्य प्रवेश द्वारावर कायमस्वरुपी पोलीस तैनात करण्यावरही विचार मंथन करण्यात आले आहे. बराकीत बारकाईने पाहणी करताना पोलीस विभागाने कैद्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले होते, हे विशेष. सुरक्षा तटाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यापासून तर वायरलेस यंत्रणा सज्ज करण्यापर्यंतचे सुरक्षा 'आॅडिट' करण्यात आले. सुरक्षेत अडथळा ठरणाऱ्या बाबी लक्षात येताच त्या लगेच दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी कारागृह प्रशासनाला दिले. प्रभारी पोलीस आयुक्त सुरक्षा आॅडिटचा अहवाल राज्याच्या कारागृह प्रशासनाच्या अतिरिक्त महानिदेशकांना पाठविणार असून त्याची प्रत कारागृहाला देतील.सुरक्षा 'आॅडिट'मधील या आहेत त्रुटीसुरक्षा यंत्रणेत बऱ्याच त्रृट्या आहेत. मात्र, ठळकपणे काही बाबींची पूर्तता लगेच करणे आवश्यक आहे. यात दोन सुरक्षा मनोरे, तटावर विद्युत वायरींग फिनिशिंग, वायरलेस सेट, एक्स-रे स्कॅनर, डीप सर्च मेटल डिटेक्टर, नॉनलिनियर जंक्शन डिटेक्टर, एक्सपोझिव्ह व्हेपर डिटेक्टर, व्हिडीओ डोअर फेम, बॉम्ब सूट, बुलेटफ्रुफ जॅकेट, सर्च लाईट, नाईट व्हिजन दुर्बीण, एक्सटेंशन मिरर, लेटर बॉम्ब डिटेक्टर, होम वायरलेस सिक्युरिटी, बुलेटफ्रुफ हेल्मेट, अर्थ इमेजर आदी यंत्रणांचा समावेश आहे.
प्रभारी सीपींनी केले कारागृहाचे सुरक्षा 'आॅडिट'
By admin | Published: April 26, 2015 12:14 AM