लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. त्यात अमरावती आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी ६ नोव्हेंबरपासून सहभाग घेतला आहे. राज्य शासनात विलिनीकरण होईस्तोवर कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटना व संघर्ष ग्रुपमार्फत संप पुकारण्यात आला आहे.ऐन दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढली असताना एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीनिमित्त गावी आलेल्या नागरिकांना परत जाण्याकरिता खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. याचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी तिकीट दर वाढविले असून, नाहक पैसा खर्च करण्याची वेळ या संपामुळे प्रवाशांवर ओढावली आहे. या संपात संजय मालविय, राजेश विजयकर, संजय बंसोड, अशोक बोरकर, आशिष वलिवकर, शिवदास भारती, विनोद ढोलवाढे, बाळासाहेब सावळे, सत्यम सोनोने, अजय तायडे, प्रवीण ढोके, राहुल उईके, अलिम, प्रशांत सकसुळे, गोपाल कोहळे, अमोल क्षीरसागर, अ. हनिफ, सतीश कडू, हरिओम इंगोले, अशोक आमझरे यांच्या २०८ कर्मचारी सहभागी झालेले आहेत.
खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूटअमरावती-दर्यापूर एसटी बसची तिकीट ९० रुपये असताना संपाचा गैरफायदा घेत खासगी वाहनधारकांद्वारा चक्क १५० रुपये आकारण्यात येत आहे. नाईलाज म्हणून प्रवाशांना दीडशे रुपये देऊनही दाटीवाटीने प्रवास करावा लागल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
अपघात विम्याची जमा रक्कम गेली कुठे? तत्कालीन राज्यपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात सन २०१६ मध्ये प्रत्येक प्रवासी तिकिटावर अपघात विम्यासाठी एक रुपया जमा करण्याचा निर्णय झाला. त्याद्वारा प्रतिदिवस राज्यभरातून ६० लाख रुपये जमा होत आहे. ती रक्कम आहे कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.