अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचारी आणि सोयीसुविधांची माहिती दडवून ठेवल्याने ६० लाखांचा आयकर घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. येथील आयकर विभागाने ५ जानेवारी रोजी खेडकर यांच्यासह विद्यापीठाला नोटीस बजावली.
मोहन खेडकर हे विद्यापीठात २३ फेब्रुवारी २०११ ते २४ फेब्रुवारी २०१६ दरम्यान कुलगुरू होते. आयकर विभागाने सुसज्ज कुलगुरू बंगल्यावर खेडकरांनी घेतलेल्या वीज, पाणी, फर्निचर, नोकर-चाकर आदी सुविधांवरील खर्चावर बोट ठेवले आहे. वीज, फर्निचर, बागवान, बंगल्यावर कामगार, घरकामगार, सुरक्षा रक्षक, कायमस्वरूपी कर्मचारी आणि वॉचमन यांच्यासाठी पाच वर्षांत १ कोटी ३९ लाख रुपये खर्च झाल्याची आकडेवारी आहे. या खर्चाच्या अनुषंगाने खेडकरांच्या मासिक वेतनात ही रक्कम नमूद होणे नियमावलीनुसार आवश्यक होते. मात्र, खेडकरांनी पाच वर्षांत सुसज्ज कुलगुरू बंगल्यावर सर्वच सुविधा घेतल्या आहेत.
तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी पदाचा दुरूपयोग करून ही माहिती आयकर विभागाला कळविली नाही. आयकर विभागाकडे फॉर्म क्रमांक १६ व १२ बी.ए.मध्ये कर्मचारी वेतन, बंगल्यावर फर्निचरसह अन्य सुविधांवर झालेला खर्च नमूद केला नाही. खेडकरांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचाºयांचे वेतन, सुविधांवरील खर्च सादर केला नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने माहिती अधिकारातून स्पष्ट केले होते. खेडकर यांच्या पाच वर्षांच्या काळात कर्मचारी वेतन, माळी, सफाई कर्मचारी, पाणी, विद्युत, फर्निचर सुविधा, कंत्राटी कर्मचारी आदींचा खर्च १ कोटी ३९ लाख रुपये झाला आहे. त्यामुळे आयकर विभागाने कर चोरीप्रकरणी तत्कालीन कुलगुरू खेडकर यांच्यावर ६० लाखांच्या आयकर चोरीचा ठपका ठेवला आहे. आता खेडकर यांच्याकडून मूळ आयकर चोरीचे ४२ लाख आणि १९ लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यानुसार मोहन खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांवर खर्च झालेल्या वेतनाची रक्कम तत्कालीन कुलगुरू खेडकर यांना पाच वर्षांत १ कोटी ३९ लाखांच्या वेतनावर ६० लाखांचे दंड आकारले आहे. यात नियमित कर्मचारी वेतन ७८ लाख ३७ हजार, दैनंदिन कामगार २ लाख ४४ हजार, माळी आणि कंत्राटी कर्मचारी २२ लाख २७ हजार, वीज देयके ५ लाख, फर्निचर साहित्य खरेदी ५ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. आयकर विभागाकडून प्राप्त नोटीसबाबत कल्पना नाही. मात्र, तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांच्या खर्चाच्या अनुषंगाने आलेल्या नोटीससंदर्भात दखल घेतली जाईल.- भारत कऱ्हाड वित्त व लेखाधिकारी, अमरावती विद्यापीठ