मुख्य रस्त्याची दुर्दशा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षटाकरखेडा संभू : नजीकच्या वलगाव ते चांदूरबाजार या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना येथे नित्याने घडल्या आहेत. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने परिसरातील नागरिकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. चांदूरबाजार या मुख्य मार्गावरील वलगाव ते दर्याबाद दरम्यान रस्त्याची दुर्दशा झाली आहे. यादरम्यान अनेक मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत. त्यामुळे दररोज या मार्गावर किरकोळ अपघाताच्या घटना घडतात. याबाबत कित्येकदा नागरिकांनी प्रशासनाला तक्रारीदेखील दिल्या आहेत. परंतु याची दखल प्रशासनाने घेतली नाही. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दररोजच अनेक अपघाताच्या घटना या मार्गावर घडतात. शिवाय वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वलगाव ते चांदूरबाजार हा वर्दळीचा रस्ता असल्याने दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. शिवाय या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांना कंबरदुखीचा त्रास होऊ लागला आहे. वलगाव ते दर्याबाद या ४ ते ५ किलोमीटरच्या अंतरावर १०० ते १५० मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सदर रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करवून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे. (वार्ताहर)अपघाताच्या घटनांमुळे नागरिक त्रस्तमार्गावर मोठमोठे खड्डे असून ते वाहकांना दिसत नाही. त्यामुळे येथे दररोज अपघाताच्या घटना घडतात. या अपघातांमुळे परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. या घटना टाळण्यासाठी स्वत: शेतकरी आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन खड्डा दर्शविण्यासाठी रस्त्यावर चुना टाकला आहे.
वलगाव-चांदूरबाजार मार्गावर अपघातात वाढ
By admin | Published: February 05, 2017 12:10 AM