अमरावती : राज्यातील कारागृहे कैद्यांनी तुडुंब भरली आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असल्याने अंतर्गत सुरक्षेचा बिकट झाला आहे. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांकडून कारागृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. नागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे अंतर्गत सुरक्षा धोक्यात आल्याचे हे संकेत मानले जात आहे. विश्वसनीय सूत्रांकडून नागपूर मध्यवर्ती कारागृहात सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास जेलर वामन निमजे हे फाशी यार्डात गस्तीवर असताना जन्मठेपेचा आरोपी साहिल अजमत कासलेकर (३३, नायसी, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी) याने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात एकच खळबळ उडाली आहे.
साहिल याच्या नेतृत्वात २८ जून, २०२२ रोजी अमरावती जेल ब्रेकची घटना घडली होती. यातील दोन आरोपी अद्यापही पसार आहेत. अमरावती मध्यवर्ती कारागृहात शनिवार, २१ जानेवारी रोजी ५ ते रात्री ११ वाजताच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहातून आलेल्या आठ न्यायाधीन कैद्यांनी अमरावती येथील दोन कैद्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या दोन्ही कैद्यांना कारागृहातील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी या आठ कैद्यांविरुद्ध २२ जानेवारी रोजी पहाटे गुन्हा दाखल केला आहे. ऋषिकेश मोडक व अर्जुन घुगे अशी जखमी कैद्यांची नावे आहेत. कैद्यांमध्ये होणारी हाणामारी थांबविण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, येरवडा येथील न्यायधीन बंदी त्या दोन्ही कैद्यांवर तटून पडले होते. अजय घाडगे, अक्षय सोनसे, आकाश मिरे, आशिष डाकले, अर्जुन मस्के, प्रज्योत पांडुरंग, अभिषेक खाेंड व अमिर मुजावर अशी आरोपी कैद्यांची नावे आहेत, तर नोव्हेंबर २०२२ मध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता, पण ही बाब पोलिसांत न पोहोचता, स्थानिक स्तरावर निस्तारण्यात आल्याची माहिती आहे. कैद्यांकडून हल्ल्याच्या घटनांविषयी राज्याच्या कारागृह प्रशासनाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.
१०० तुरुंगाधिकारी, नऊ अधीक्षकांची पदे रिक्त
मध्यवर्ती, जिल्हा, विशेष सेवा सुधार, महिला, खुले कारागृहात सुमारे १०० पदे तुरुंगाधिकाऱ्यांची रिक्त आहे. ३५० पेक्षा जास्तसुरक्षा रक्षक आणि मध्यवर्ती कारागृह नऊ अधीक्षकांची पदे रिक्त आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे प्रशासकीयदैनदिन कामे खाेळंबत असून, अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सात मध्यवर्ती कारागृहात अधीक्षकांचा प्रभारी कारभार सुरू आहे.
हल्ला, तक्रारी; कैद्यांची हिंमत बळावतेय
कारागृहात अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे हेरून काही सराईत गुन्हेगारांकडून मानवाधिकाराचे आयुध वापरून न्यायालयात तक्रार केली जाते. याप्रकरणी न्यायाधीशाकडून चौकशी आरंभली की कैदी आपसात दबावगट तयार करतात आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. चौकशीसाठी आलेल्या न्यायाधीशाकडूनसुद्धा कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे कारागृहात कैद्यांची हल्ला अथवा खोट्या तक्रारी करण्यासाठीची हिंमत बळावत असल्याचे चित्र आहे.