कुलगुरुंचे प्रतिपादन : विद्यापीठात ‘प्लेसमेंट आॅफिसर्स’ कार्यशाळाअमरावती : शिक्षणानंतर विद्यार्थांना रोजगार मिळावा, यासाठी प्लेसमेन्ट आॅफिसर्सनी पुढाकार घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना तयार करावे व जास्तीत-जास्त रोजगार मेळावे आमंत्रित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन कुलगुरू मोहन खेडकर यांनी केले. करिअर अॅण्ड काऊंसिलिंग सेलच्यावतीने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्लेसमेंट आॅफिसर्ससाठी एकदिवसीय सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यशाळा विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहात आयोजित केली होती. त्याचे उद्घाटन करताना कुलगुरू बोलत होते. व्यासपीठावर तज्ज्ज्ञ वक्ते डॉ. कैलास एस. कडू, राजेश प. पडोळे, विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे, प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाचे संचालक श्रीकांत पाटील उपस्थित होते. कर्मयोगी संत गाडगेबाबा व माता सरस्वतीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. पुढे बोलताना कुलगुरू खेडकर म्हणाले, सर्व विद्यापीठात शिक्षण सारखेच दिले जाते. तरीदेखील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा ओढा पुणे-मुंबईकडे अधिक असतो. त्याचे कारण म्हणजे त्याठिकाणी उद्योगधंदे अधिक प्रमाणात आहेत. रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या भागात तुलनेने उद्योगधंदे कमी आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळून देण्यासाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करून रोजगाराची संधी देण्यासाठी प्लेसमेंट आॅफिसर्सने पुढाकार घ्यायला पाहिजे. येथील विद्यार्थ्यांचा न्यूगंड म्हणजे भाषेची समस्या, विषयाचे ज्ञान, आत्मविश्वासाची कमतरता, मुलाखततंत्र कौशल्य आदींमुळे त्याला रोजगार मिळण्यात अडसर निर्माण होतो. यासाठी प्लेसमेंट आॅफिसर्सनी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन स्तरावर मुलाखततंत्र अॅप्टीट्यूड टेस्ट, प्रशिक्षण आयोजित करण्याचे आवाहन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक कैलाश एस. कडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात त्यांच्यासोबत संवाद कसा साधावा याविषयावर राजेश पडोळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून कॅम्पस रिक्रूटमेंटसाठी पूर्वतयारी कशी करून घ्यावी, या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सेल्प प्रोफाईल इंट्रॉडक्शन कसे करावे हे येणा-या कंपनीच्या जागा भरतीवर केंद्रित असते. त्याबद्दल विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती कशी द्यावी, कॅम्पसमध्ये सिलेक्ट न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम कसे राबविता, येईल याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन राजेश पिदडी यांनी केले. दुपारच्या सत्राचे संचालन अमित देशमुख यांनी केले. प्लेसमेंट कार्यशाळेच्या उद्घाटनाला शिक्षण विभागप्रमुख गजानन गुल्हाने, विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील प्लेसमेंट आॅफिसर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी कंपनीचा डेटा जमा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध सर्च टुल्सबद्दलची माहिती आणि कंपनीचा फालोअप घेताना लक्षात ठेवण्यासारख्या बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगावे. विद्यार्थ्यांकडून कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी पूर्वतयारी कशी करून घ्यावी या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सेल्प प्रोफाईल इंट्रॉडक्शन कसे करावे हे येणाऱ्या कंपनीच्या जागा भरतीवर केंद्रित असते. त्याबद्दल विद्यार्थ्यांना ती माहिती सारांश करून कशी सांगता यावी, यावर अभ्यास करण्याबाबत माहिती तज्ज्ञांनी दिली. कॅम्पसमध्ये सिलेक्ट न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेवून त्याचे आॅफ कॅम्पस रिक्रूटमेंट कसे करता येईल याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
रोजगार मेळाव्यांची संख्या वाढावी
By admin | Published: August 30, 2015 12:10 AM