मोर्शी : बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असून धरणात पडलेल्या पावसामुळे केवळ एकाच दिवसात ८५ मिलिमीटर पाण्याची वाढीव नोंद करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या मोर्शीपासून अवघ्या आठ किमी अंतरावरील अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ जुलैच्या सकाळपासून संततधर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील जामनदी, सालबर्डी येथून महाराष्ट्रात वाहणारी माडू नदी व इतरही नद्या पाण्यामुळे ओसांडून वाहत असल्याने अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. अप्पर वर्धा धरणातील पाणीपातळी ३४२.५० मीटर एवढी निर्धारित ठेवण्यात आली आहे. कालपासून संततधर कोसळत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत २१ सेंटिमीटरने वाढ झाली असून, सध्या अप्पर वर्धा धरणात ३३८.६३ मीटर पाणी जलसाठा झाला आहे. सध्या धरण ४८ टक्के भरले असून, ८० टक्के धरण भरल्यास अप्पर वर्धा धरणाची दरवाजे उघडण्याचा विचार करता येईल, असे अप्पर वर्धा धरणाचे उपविभागीय अधिकारी रमण लायचा यांनी सांगितले. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ३३८ हजार मीटर प्रतिसेकंद पाण्याचा येवा धरणात येणे सुरू आहे.