इंदल चव्हाण-
अमरावती : काही क्रिटिकल परिस्थीमुळे गर्भवती मातेचे गर्भपात करणे आवश्यक असते. त्याला शासनमान्यता असल्याने सन २०१९ मध्ये २१३ गर्भपात करण्यात आले होते. मात्र, कोरोनाकाळात सन २०२० मध्ये तब्बल ३६३ गर्भपात झाल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून पुढे आले आहे.कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार गेला. आर्थि. चणचणीमुळे दवाखान्यात योग्य औषधोपचार घेणे शक्य झाले नाही. खानपानाची योग्य व्यवस्था होऊ शकली नाही. अशा अनेक कारणांमुळे बाळाच्या पोषकतेत उणीव निर्माण झाल्याने गर्भातच बाळांना व्यंगत्व आल्याचे सोनोग्राफीअंती निदान झाले. परिणामी ते जन्मदात्री आईसाठी धोक्याचे ठरल्याने वा अन्य कारणांमुळे गर्भपात करावे लागले. अशा २१३ घटना मार्च २०१९ ते एप्रिल २०२० दरम्यान घडल्या आहेत. तसेच मार्च २० ते एप्रिल २०२१ दरम्यान ३६३ गर्भपाताच्या घटना घडल्या असून, एप्रिल ते जून २०२१ दरम्यान अवघ्या तीन महिन्यात ७८ मातांचे गर्भपात करावे लागल्याचे वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी केवळ शासकीय रुग्णालयातील असून याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयात व डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयातील आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कोरोनाकाळात केवळ आर्थिकच अडचण नव्हे तर आरोग्यविषयक अडचणींचाही अनेकांना सामना करावा लागल्याचे स्पष्ट होत आहे.
गर्भपाताची आकडेवारी
जिल्हा स्त्री रुग्णालय -
सन २०१९ - २१३
सन २०२० - ३६३
सन २०२१ - ७८
पीडीएमसी
सन २०१९ - १६६
सन २०२० - १२८
सन २०२१ - --
बॉक्स
गर्भ असताना कोरोना झाला तर
महिलेच्या पोटात गर्भ असताना कोरोना झालाच तर त्याचा गर्भावर काही परिणाम झाल्याची आतापर्यंत अशी कुठे नोंद नाही. तसेच आता गर्भवती मातेला व्हॅसिनेशनची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर गर्भवती मातांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कोट
कोरोनाकाळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेतलेली आहे. त्यामुळे नाहकच गर्भपात करण्याची वेळ आली नाही. मात्र, व्यंगत्व असलेलेच गर्भपात करण्यात आले. एप्रिल ते जून दरम्यान डफरीनमध्ये १० गर्भपात केल्या गेले.
- विद्या वाठोडकर, अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय