लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशांतर्गत होणाऱ्या मादक पदार्थांच्या तस्करीने सर्वच राज्यांची चिंता वाढविली असून त्यादृष्टीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांची बैठक शनिवारी येथे पार पडली.
अवैध गोवंश वाहतूक, अवैध मानवी वाहतूक, बेकायदेशीर खनिज उत्खनन, अवैध शस्त्रे, गुटखा, दारुविक्री, मादक पदार्थांची तस्करी दोन्ही राज्यांसाठी अतिशय चिंतेचा विषय असून, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमेवरील चेकपोस्ट व सुरक्षा यंत्रणेला पुरेसे मनुष्यबळ पुरविणे आवश्यक आहे. तेथे सीसीटीव्ही यंत्रणा बसवून चोख निगराणी ठेवावी, तसेच नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलिस खात्याने संयुक्त अभियान राबवावे, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, की पूरस्थिती व सिंचन प्रकल्पासंबंधीचे प्रश्न स्थानिक स्तरावर समन्वयाने सोडवावेत. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या नोंदी विशेष ॲप तयार करून नियमित घ्याव्यात, जेणेकरून त्यांची माहिती दोन्ही राज्यांतील प्रशासनाला मिळून त्यांना विविध योजनांचा लाभ देता येणे शक्य होईल. सीमावर्ती जिल्ह्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीचा दोन्ही राज्यांना फायदा होईल, असा विश्वास मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी व्यक्त केला.
ठाकरे गट शिवसैनिकांचे आंदोलन
महापुरुषांचा अपमान आणि वादग्रस्त व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बैठकीसाठी आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाहनांच्या ताफ्याला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी चपला दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी वाहनांच्या ताफ्यामध्ये चपला घेऊन शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"