अमरावती : उन्हाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात वनवणव्यांच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात उपाययोजनांना गती आली आहे. मात्र यंदा वनवणव्याने वन्यजीव होरपळून दगावले, अशा एकाही घटनेची नोंद नाही. तथापि, वनवणवा आणि तप्त उन्हाने वन्यजीवांना सैरभर व्हावे लागत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात वनवणव्यांच्या घटना घडत असतात. मात्र, यंदा फेब्रुवारीपासूनच वनवणवा लागत आहे. त्यामुळे वनविभागाने नियोजन कोलमडले आहे. विशेषतः विदर्भात वनक्षेत्राला आगी लागण्याच्या घटना दररोज निदर्शनास येत आहे. वनवणवा नियंत्रणासाठी जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याकरिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. वणवा नियंत्रणासाठी २४ तास वनकर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वनक्षेत्र अथवा व्याघ्र प्रकल्पातील आगीची माहिती मिळावी, यासाठी नासा सॅटेलाइटद्वारे वनविभागाला ‘फायर अलर्ट’ दिले जाते. वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी वनक्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर लक्ष आहे.
वनविभागासाठी दीड महिना धोक्याचा
नासाचे फायर अलर्ट हे वनविभागासाठी महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, पुढील दीड महिना जंगल क्षेत्रातील वणवा नियंत्रणात आणणे ही बाब वनविभागासाठी कसरत आहे. दऱ्या-खोऱ्यात आग लागल्यास तेथेपर्यंत पोहोचण्यासाठी अपुरे साधनसामग्री हीदेखील मोठी समस्या आहे. एप्रिलअखेरचा आठवडा आणि मे महिन्यात वणवा लागण्याची दाट शक्यता आहे. तप्त उन्ह आणि वनवणवा या दोन्ही बाबी वन्यजीवांसाठी धोकादायक ठरणाऱ्या आहेत.
यावर्षीच्या उन्हाळ्यात वनवणवा अथवा तप्त उन्हाने वन्यजीव होरपळून दगावले अशी घटना घडली नाही. खरे तर विदेशासारखे आपल्याकडील वनक्षेत्रांना चहुबाजूने आग लागत नाही. त्यामुळे कमीअधिक प्रमाणात आग आटोक्यात आणली जाते. वणव्यांवर यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव विभाग)