बच्चू कडू : अचलपूरला २५५, चांदूर बाजार येथे ७५ बेड
परतवाडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्या वाढत असल्याने अचलपूर तालुक्याला २५५ व चांदूर बाजार तालुक्याला ७५ बेड ऑक्सिजन व्यवस्थेसह वाढविण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी कोरोना स्थिती व रुग्णांसंदर्भात अधिकारी व डॉक्टरांसोबत त्यांनी आढावा घेतला.
कोविड-१९ रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नांतून परतवाडा येथील कुटीर रुग्णालयात ५० खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले. या रुग्णालयामध्ये आजवर अनेक गरजू रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात आल्या. अनेक रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले.
बॉक्स
अचलपुरात ८३६ रुग्णांवर यशस्वी उपचार
अचलपूर येथील रुग्णालयात जानेवारी ते एप्रिलपर्यंत ८३६ कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. त्यामधुन ७०७ कोविड रुग्ण बरे झाले. १२२ रुग्णांना तालुक्याबाहेर स्थानांतरित केले. ६४ कोविड रुग्ण कुटीर रुग्णालयात उपचार घेत आहेत. येथील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
बॉक्स
आता एकूण ७५ ऑक्सिजन बेड
पूर्वी कोविड सेंटर येथे उपलब्ध असलेले १५ अतिदक्षता, ३० ऑक्सिजन व ५ सामान्य बेड असे एकूण ५० बेड होते. त्यामध्ये आता वाढ होणार असून, संपूर्ण ७५ ऑक्सिजन बेड राहणार आहेत.
बॉक्स
अचलपूर, चांदूर बाजारात बेड वाढणार
परतवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहात ६५ बेड उपलब्ध असून, त्यामध्ये १५ बेड वाढणार आहेत. बुरडघाट येथील कोविड सेंटरला १०० बेड उपलब्ध आहेत. यामुळे आता अचलपूर येथे २५५ बेड कोविड-१९ रुग्णसेवेकरीता उपलब्ध होतील. चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड व २५ जनरल बेडची व्यवस्था तात्काळ करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.
--------------
कॅप्शन - उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात बैठक घेताना राज्यमंत्री बच्चू कडू.