अमरावती : कोरोना संसर्गाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने त्यासाठी शहरातील रुग्णालयांमध्ये यंत्रणा तयार करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी दिली.
आयुक्तांनी या अनुषंगाने आढावा घेतला. ऑक्सिजन लीक होणार नाही, यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ऑक्सिजन ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट त्वरित करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. रुग्ण अंगावर लक्षणे काढत असल्याने त्या रुग्णांची स्थिती गंभीर होत असल्याचे आयुक्त म्हणाले. बैठकीला उपायुक्त सुरेश पाटील, उपायुक्त रवि पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, एमओएच डॉ. विशाल काळे, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे आदी उपस्थित होते.
आयुक्तांनी मंगळवारी डेंटल कॉलेज, बिच्छुटेकडी, सबनीस प्लॉट व बडनेरा येथील लसीकरण केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. याशिवाय कोरोना स्वॅब सेंटरला त्यांनी भेट दिली व उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
बॉक्स
शहरातल्या स्मशानभूमीतील सुविधांचा आढावा
कोरोनाग्रस्तांची मृत्युसंख्या वाढत असल्याने स्मशानभूमीमध्ये ओटे कमी पडू नये, असे स्पष्ट करतानाच आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने विलासनगर, नवसारी, शेगाव स्मशानभूमी, एसआरपीएफ व शंकरनगर येथील स्मशानभूमींच्या ठिकाणी विद्युत, पाणी, स्वच्छता, प्रसाधनगृहांची दुरुस्ती, शेड बांधकाम आदी सुविधा करण्यात येत आहे. यासंदर्भात पाचही झोनचे उपअभियंत्यांना आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.