लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : कोरोनामुळे बदललेली जीवनशैली, त्यात व्यायामाचा अभाव असल्याने हृदयविकाराचा धोका वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात तालुक्यात १२ जणांना हृदयविकाराचा झटका आला, तर तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले. तब्बल तीन महिने सर्वच कुटुंब एका ठिकाणी असल्याने अनेकांनी आपल्या दैनंदिनीत व्यायामाला महत्त्व दिले नाही. अनलॉक घोषित झाल्यानंतर सरकारने पहाटेच्या रपेटीला परवानगी दिली. मात्र, पहाटे ५ वाजता उठून रस्त्यावर फिरणे सोडाच, गच्चीवरील चार पायऱ्यादेखील चढण्याचा कंटाळा हा अनेकांचा स्वभाव झाला आहे. विशेषत: दररोज घरी तेलकट पदार्थ खाणे व बेडवर विश्रांती करणे एवढेच काम केल्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक वाढला आहे. हृदयविकारामुळे तालुक्यात तिघांना आपला जीव गमवावा लागला. यात ५६ ते ६९ वयोगटातील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून अनेक गंभीर आजारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्याला छातीत दुखत जरी असेल तरी जिल्हा रुग्णालयात गेल्यावर सर्वप्रथम कोरोनाची तपासणी केली जाते, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हृदयविकाराची लक्षणे दिसत असले तरी अनेकांनी तपासणी करून घेतली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे तालुक्यात हृदयविकाराचा धोका वाढला आहे. आतापर्यंत चार महिन्यांत १२ जणांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती तालुक्यातील वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.अशी घ्या हृदयाची काळजीपहाटे उठून रपेट मारा व योगा करा. घर किंवा कार्यालयाच्या पायºया चढणे हा हृदय निरोगी राखण्याचा सर्वांत सोपा उपाय आहे. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतात. या घटकांचा हृदय निरोगी राखण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. त्यामुळे जेवणात पालेभाज्यांचा समावेश करा. मात्र, एकाच वेळी जास्त अन्न खाल्ल्याने पचनक्रियेवर आणि हृदयावर विपरीत परिणाम होतो. मिठाचा वापर जास्त केल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हे कोलेस्टेरॉल हृदयासाठी अतिशय घातक ठरू शकते. नेहमी ताण राहिल्यास त्याचा प्रभाव हृदयावर पडतो. म्हणून मनमोकळे राहा. व्यसनांपासून दूर राहिल्यास हृदयविकाराचा धोका संभवत नाही.कोलेस्टेरॉलचा थर धोकादायकआपल्या शरीरातील रक्तवाहिनीच्या पोकळीत कोलेस्टेरॉलचा थर साचून रक्तवाहिनीची रुंदी कमी होते. अनेकदा रक्त गोठून प्रवाह पूर्णपणे बंद होतो व पुढील भागास रक्त न मिळाल्याने तो भाग निर्जीव होतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, कोलेस्टेरॉल जास्त असणे व त्यासोबत तंबाखू, धूम्रपान-मद्यपान, अवेळी जेवण, कामाचा ताणतणाव, व्यायामाचा अभाव यामुळे अल्प वयात हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे.कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे हृदयविकारासारख्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. हृदयविकारावर त्वरित उपचार झाले, तर रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोनासोबतच हृदयविकाराच्या आजाराला रुग्णांनी अधिक महत्त्व द्यावे.-डॉ. चेतन राठीहृदयरोगतज्ज्ञ, धामणगाव रेल्वे
धामणगावात वाढतोय हृदयविकाराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 5:00 AM
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले. तब्बल तीन महिने सर्वच कुटुंब एका ठिकाणी असल्याने अनेकांनी आपल्या दैनंदिनीत व्यायामाला महत्त्व दिले नाही. अनलॉक घोषित झाल्यानंतर सरकारने पहाटेच्या रपेटीला परवानगी दिली. मात्र, पहाटे ५ वाजता उठून रस्त्यावर फिरणे सोडाच, गच्चीवरील चार पायऱ्यादेखील चढण्याचा कंटाळा हा अनेकांचा स्वभाव झाला आहे.
ठळक मुद्दे१२ जणांना झटका : तिघांचा मृत्यू, व्यायामाचा अभाव प्रमुख समस्या