गजानन मोहोड - अमरावतीकमी उत्पादन खर्चात व ११० दिवसांच्या कालावधीत येणारे, इतर पिकांच्या तुलनेत चांगला भाव मिळत असल्याने ‘कॅश क्रॉप’ या अर्थाने सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. वारंवार तेच पीक घेत असल्याने जमिनीचा पोत खराब होऊन चक्रीभुंगा, पिवळा मोझॅक व खोडकीड सारख्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पिकासाठी घातक ठरू लागला आहे. यामुळे सरासरी उत्पन्नात घट येत आहे. यासाठी पिकबदल होणे महत्त्वाचे असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.मागील वर्षी पेरणीपासून सततचा पाऊस व सोयाबीन मळणीच्या हंगामात परतीचा पाऊस यामुळे सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांनी कमी आली. सोयाबीन डागाळले, त्याची प्रतवारी व उगवणशक्ती कमी झाली, असे सोयाबीन पेरणे धोकादायक असल्याचे कृषी विभागासह कृषी तज्ज्ञांनी सांगितले असले तरी यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले. पर्याय उपलब्ध नाही असे सांगण्यात येते, उगवणशक्तीची गॅरंटी यावेळी महाबीजनेही दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. तरीही क्षेत्र मात्र वाढले आहे. यंदा जिल्ह्यात खरीपाची ६ लाख ७९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली यापैकी ३ लाख १९ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. एकूण पेरणीक्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणी क्षेत्र जवळपास ५० टक्के आहे.साधारणपणे १९९५ पासून जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढण्यास सुरूवात झाली. आता तर सोयाबीन क्षेत्राने अर्धे पेरणी क्षेत्र व्यापले आहे. याचा प्रतिकूल परिणाम सोयाबीनवरच व्हायला सुरुवात झाली आहे. वारंवार सोयाबीन पेरल्यामुळे सोयाबीनवर खोडकूज (रूटरॉट) खोडकीड (स्टेमबोअरर) व्हायरल (मोझॅक) चक्रिभुंगा (गर्डर बिडल) सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. एकच एक पीक वारंवार घेतल्याने जमिनीतील ठराविक अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात खेचल्या जातात. त्यामुळे त्या अन्नद्रव्याचे उत्पादन कमी होते हे त्या पिकासाठी, शेतासाठी घातक ठरत आहे.
दरवर्षी वाढणारे सोयाबीन पेरणी क्षेत्र घातकच!
By admin | Published: February 01, 2015 10:47 PM