अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे तृतीयपंथीय समुदायासाठी स्वतंत्र आरोग्य मार्गदशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन गुरू प्रवीण यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामधून तृतीयपंथीयांना आरोग्य सुविधेबरोबरच इतर आवश्यक माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, गुरू गुड्डी, हेमंत टोकशा, जिल्हा विधि प्राधिकरणच्या वरुडकर, अंजली देशमुख, राजेंद्र साबळे, राजेश तुपाने, किंजल रेखा पाटील, ममता काजल, गुरू मारिया जान, पूजा तेलमोरे, राशी मोगली उपस्थित होते.
शासकीय आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तृतीयपंथीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे रुग्णालयात त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शनामध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी तृतीयपंथीयांना समाजाने आता दूर न लोटता जवळ करावे आणि त्यांच्याविषयी असलेला गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. तृतीयपंथीय समुदायदेखील सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
तृतीयपंथीय समुदाय तसेच एचआयव्ही संक्रमित तसेच जोखीम गटातील महिला व पुरुष यांना जिल्हा विधी प्राधिकरणतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन ॲड. वरुडकर यांनी केले. एचआयव्ही कायदा २०१७ च्या प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून एका विशेष मोहिमेची सुरुवात जिल्हा विधी प्राधिकरण करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात तृतीयपंथीय, अतिजोखीम गटातील स्त्रिया, एचआयव्ही संक्रमित व्यक्तींचे आभा कार्डची नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक श्याम वहाणे यांनी केले. आभार लोकेश पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी आरती इंगळे, नीता गोगटे, अजय वरठे, प्रमोद कळसकर, नरेश मंथपूरवार, जयश्री नागपुरे, अतुल गुहे, कृष्णा नागले, आदित्य पिंजरकर, प्रेमराज गुंजाळ, गौरव ढवळे, धीरज तायडे अक्षय गोहाड, अमित बेलसरे आदी उपस्थित होते.