अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्याअंतर्गत इर्विनमधील रक्तपेढी व ओपीडीच्या विस्तारीकरणासह सुपर स्पेशालिटी परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय होत आहे. पुढील काळात उत्तम उपचारासाठी या सुविधा उपयुक्त ठरतील, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात सुमारे सव्वा कोटी रुपये निधीतून रक्तपेढी व बाह्यरुग्ण विभागाचा विस्तार आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने पुढील दोन महिन्यांत १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, महापौर चेतन गावंडे, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयातील कार्यक्रमात डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांच्याशीही संवाद साधला. त्या म्हणाल्या की, गेले सव्वा वर्ष कोरोनाकाळात डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी अविश्रांत काम करीत आहेत. त्यांचे योगदान अमूल्य आहे. मात्र, अजूनही साथ संपलेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे रुग्णसेवा अखंडित ठेवत साथ नियंत्रणासाठी आवश्यक ती सर्व कामे सगळ्यांनी समन्वयाने पार पाडायची असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बॉक्स
‘फोर झोन स्ट्रॅटेजी’वर रचना
रुग्णालयाची रचना फोर झोन स्ट्रॅटेजीवर आधारित असेल. झोन १ मध्ये डॉक्टर्स व हेल्थ केअर वर्कर्सचे कार्यालय, थांबण्याची व्यवस्था असेल. झोन २ मध्ये बाह्य रुग्ण विभाग व आरटी-पीसीआर तसेच अँटिजेन टेस्टिंगच्या सुविधा असेल. तिथे लक्षणे असणाऱ्या, मात्र चाचणी अहवाल प्राप्त न झालेल्या रुग्णांचा कक्ष असेल. झोन ३ मध्ये बाधितांसाठी विलगीकरण व उपचार कक्ष असेल. झोन ४ मध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईप लाईन, काॅन्सन्ट्रेटर, अतिदक्षता कक्ष उपलब्ध असेल.
बॉक्स
येथे होणार गंभीर रुग्णांवर उपचार
या ठिकाणी गंभीर रुग्णांवर उपचार होतील. त्याशिवाय, प्रतीक्षा कक्ष, कन्सल्टेशन रूम, एक्झामिनेशन वॉर्ड आदी कक्षही असतील. रुग्णालयात हवा खेळती राहण्यासाठी टर्बो व्हेंटिलेटर असतील. आयसीयू वॉर्ड पूर्णत: वातानुकूलित असेल. संपूर्ण प्रकल्पाचे क्षेत्र १५ हजार फूट असून, त्यात आयसोलेशन वॉर्डचे क्षेत्र ५ हजार ६०० फूट व सर्व्हिस एरिया ७ हजार ८०० फुटांचा आहे. संपूर्ण रुग्णालय उभारणी ‘अमेरिकन इंडिया’कडून होत असून, हे रुग्णालय लवकरच उभे राहणार आहे.